कुलाबा ते सीप्झ भुयारी मेट्रोचा खर्च वाढता वाढे

‘कनेक्ट टू अनकनेक्टेड’ अशी टॅग लाईन असणाऱया मुंबईच्या पहिल्या भुयारी मेट्रो-3 चा खर्च दहा हजार कोटींनी वाढला आहे. या मेट्रोचे कारशेड काम पूर्ण झाल्याशिवाय हा मार्ग सुरू करता येणार नसल्याने आरे कॉलनीत येत्या एप्रिल महिन्यापर्यंत कारशेड बांधून पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच बीकेसी ते आरे हा पहिला टप्पा डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे टार्गेट ठरविण्यात आले आहे. मात्र भुयारी मेट्रोची काळबादेवी, गिरगाव आणि ग्रँट रोड ही स्थानके तयार होण्यास बराच काळ लागणार असल्याने या मेट्रोचा खर्च आणखीन वाढणार आहे.

मेट्रो तीन प्रकल्पाचा पहिला टप्पा आरे ते बीकेसी दीड वर्षात सुरू करायचे टार्गेट असून सिव्हिलची कामे 70 टक्के, स्थानकांची कामे 84 टक्के, टनेलिंगचे काम 100 टक्के तर सिस्टमचे काम 43 टक्के झाले आहे. परंतु काळबादेवी, गिरगाव आणि ग्रँट रोड या स्थानकांचे काम व रहिवाशांचे पुनर्वसन त्याच जागी होणार असल्याने स्थानकांवरच इमारत बांधण्याचे शिवधनुष्य पेलावे लागणार आहे. त्यासाठी वर्ष ते दीड वर्ष लागणार आहे. के-2, बी-2 बिल्डिंगचे काम सुरू आहे. येथे बीएमसीची परवानगी लागणार आहे. के-3 पूर्ण कमर्शियल बिल्डिंग आहे. त्या सर्वांना पर्यायी ठिकाणी रहाण्याचे भाडे दिले जात असल्याचे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी सांगितले.

सध्याची जागा 10 ते 12 वर्षेच पुरेल

सध्या आरेची जी जागा मिळाली आहे ती 10 ते 12 वर्षे पुरेल इतकी आहे. कारशेडचे 29 टक्के काम झाल्यानंतर स्टे आला होता. राज्यात सत्तांतर झाल्याने आरेत पुन्हा काम सुरू असून एप्रिलपर्यंत कारशेड पूर्ण करण्याचे टार्गेट आहे. मेट्रोच्या नऊ गाडय़ा दाखल होणार असून त्यांना पार्क करण्यासाठी जागा हवी आहे. त्यामुळे दीड वर्षात डिसेंबर 2023 पर्यंत आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा पूर्ण करण्याचे टार्गेट ठेवल्याचे संचालक अश्विनी भिडे यांनी सांगितले.

देशातील सगळ्यात मोठा भुयारी मार्ग

भुयारी मेट्रोचा (33.5 कि.मी.) इतक्या मोठय़ा लांबीचा मेट्रो मार्ग देशात कुठेही नव्हता. दिल्लीमधील जमीन रेताड (सॉईल) आणि मुंबईत हार्ड बेसाल्ट खडकांची जमीन आहे. दिल्ली भुयारी मेट्रो सहा डब्यांची आहे. मेट्रो-3 च्या गाडय़ा आठ डब्यांच्या आहेत. त्यामुळे दिल्ली मेट्रोपेक्षा जास्त मोठी जागा मेट्रो-3च्या गाडय़ा पार्क करण्यासाठी लागणार आहे.

काळबादेवी स्टेशन व इमारतीचे संकल्प चित्र प्रोजेक्टला उशीर का झाला

– 2011मध्ये डीपीआर मंजूर झाला
– केंद्राने 2013मध्ये मान्यता दिली
– राज्य सरकारची 2014मध्ये मंजुरी
– 2016च्या पहिल्या तिमाहीत वर्क ऑर्डर
– 2011चा अंदाजित खर्च नंतर वाढला
– 2019मध्ये प्रत्यक्षात कामाला सुरुवात
– गिरगाव, काळबादेवी व ग्रँट रोड स्थानके रखडली
– 26 अंडरग्राऊंड व 1 जमिनीवरचे स्थानकांचे काम
– कफ परेड स्थानकात निर्बंध आल्याने दीड वर्षे उशीर
– रात्री 10 नंतर कामबंदीचा जबर फटका

खर्च वाढला तरी तिकीटदरात वाढ नाही

आरेत 30 हेक्टर जागेवर मेट्रोचे कारशेड होईल. त्यातील 25 हेक्टर जागा प्रत्यक्षात कारशेडसाठी आणि पाच हेक्टर जागा उर्वरित हरितपट्टय़ात परिवर्तित करण्याचा विचार आहे. आता नऊ गाडय़ांद्वारे फेज-1 सुरू होईल. परंतु 2036 मध्ये 42 तर 2050 पर्यंत 55 गाडय़ा येतील. हा प्रकल्प आता 33,405 कोटींचा झाला आहे. आधी तो 23,136 कोटींचा होता. 21,890 कोटी मिळाले आहेत. नव्या 10,270 कोटींच्या खर्चाकरिता पेंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी लागेल. जपानच्या ‘जायका’कडून 6,600 कोटींचे कर्ज घ्यायचे आहे. त्यानंतरही प्रकल्प जसा पुढे जाईल तसा खर्च वाढण्याची शक्यता आहे. परंतु तिकीट दरात मात्र वाढ होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.