कोरोनाचा एकही रुग्ण स्क्रिनिंंगमधून निसटणार नाही! ‘मिशन झिरो’चे महापौरांच्या हस्ते उद्घाटन

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या शून्य व्हावी, या उद्देशाने ‘मिशन झिरो’अंतर्गत सात मोबाईल क्लिनिक व्हॅनद्वारे ‘डॉक्टर आपल्या दारी’ हा उपक्रम दक्षिण मुंबईत राबवण्यात येत आहे. या मोहिमेमुळे कोरोनाचा एकही संशयित रुग्ण स्क्रििंनगमधून निसटणार नाही. या उपक्रमाचा शुभारंभ महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते आज लोअर परळ (पश्चिम) येथे झाला. मुंबई महानगरपालिका, भारतीय जैन संघटना, क्रेडाई-एमसीएचआय आणि ‘देश अपनाये’ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला जात आहे.

मुंबईतील काही भागांमधील रुग्ण दुप्पटीचा कालावधी सरासरीपेक्षा कमी असल्याचे लक्षात घेऊन त्या विभागांमध्ये शीघ्र कृती कार्यक्रम राबवण्याचे महानगरपालिकेने निश्चित केले. या अनुषंगाने पावले उचलत ‘मिशन झिरो’ अर्थात शून्य कोरोना रुग्ण हे लक्ष्य गाठण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेतर्फे आतापर्यंत विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. त्यामुळे या उपक्रमाला सहकार्य करा आणि महानगरपालिकेची ‘मिशन झिरो’ आणि ‘डॉक्टर आपल्या दारी’ मोहीम यशस्वी करा, असे आवाहन यावेळी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. यावेळी नगरसेवक आशिष चेंबूरकर, भारतीय जैन संघटनेचे (बीजेएस) दक्षिण मुंबई अध्यक्ष अ‍ॅड. हसमुखभाई शहा, कुवर छेडा, जितेंद्र खिराणी उपस्थित होते.

अशी राबवली जाईल मोहीम 
1. मोहिमेचा एक भाग म्हणून दक्षिण मुंबईमध्ये डॉक्टर आपल्या दारीच्या 7 मोबाईल क्लिनिक व्हॅन धावणार आहेत. या व्हॅन वरळी, अँटॉप हिल, डोंगरी, वडाळा, चर्नी रोड, गिरगाव, फोर्ट, कुलाबा, दादर अशा विभागांमध्ये धावणार आहेत.

2) ज्या प्रभागांमध्ये कोरोना रुग्ण आढळतील त्या भागांमध्ये घरोघरी जाऊन मोबाइल दवाखाना व्हॅनची टीम संशयितांची तपासणी करेल. स्क्रिनिंग दरम्यान आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची डॉक्टर लगेच स्वाँब टेस्ट करेल. एकही कोरोना रुग्ण सुटू नये, यासाठी ही मोहीम राबवली जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या