महामुंबईत कोरोनाचे 68 नवीन रुग्ण, चार जणांचा मृत्यू

916

महामुंबईत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 68 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर चार जणांचा मृत्यू झाला आहे. पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयासह इतर रुग्णालयांमधील हा एकत्रित अहवाल पालिकेने जाहीर केला आहे.

मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत प्रतिदिन वाढच होत असल्याचे समोर येत आहे. गेला आठवड्यात पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा सरासरी 50 पेक्षा जास्त असल्याने काळजीत भर पडली आहे. आज पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयासह इतर रुग्णालयांमध्ये 150 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये 68 जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. यामध्ये ओपीडीमध्ये आज एकूण 197 जणांची तपासणी करण्यात आली. दरम्यान, पालिकेने संपूर्ण मुंबईत 226 कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केले असून अशा सर्व ठिकाणी सीसीटीव्ही, पालिकेचा वॉर रूम आणि पोलिसांच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येत आहे.

एका दिवसांत पाच कोरोनामुक्त
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी आतापर्यंत मुंबईत तब्बल 59 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजच्या दिवसात एकूण पाच जणांचे रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, रुग्ण कोरोनामुक्त झाले असले तरी पालिकेच्या माध्यमातून अशा रुग्णांवर वैद्यकीय देखरेख ठेवण्यात येत आहे. शिवाय आतापर्यंत 10 हजार 968 जणांना क्वारेंटाईन करण्यात आले आहे. यातील 3990 जणांचा क्वारेंटाईन कालावधी 5 एप्रिलपर्यंत पूर्ण झाला आहे.

महापौरांकडून आरोग्य यंत्रणेचा आढावा

मुंबईत कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज महापालिकेच्या शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालय आणि विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयाला भेट देऊन रुग्णालयातील उपाययोजना आणि वैदयकीय सुविधांचा आढावा घेतला. कोरोनाचा बिमोड करण्यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे, अशा सूचना केल्या. यावेळी सायन रुग्णालयाच्या उप अधिष्ठाता डॉ. विद्या महाले, कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. पिनाकिन गुज्जर आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या