मुंबईत मान्सूनची गाडी 24 जूनपर्यंत लेट, ‘वायू’ इफेक्ट

सामना प्रतिनिधी। मुंबई

चार दिवसांपासून रिपरिपणाऱया पावसामुळे मुंबईकरांची घामाच्या धारांपासून सुटका झाली असली तरी त्यांच्यासाठी एक बॅड न्यूज आहे. मुंबापुरीला खऱया अर्थाने ओलेचिंब करून टाकणाऱया मान्सूनची गाडी आणखी आठ दिवस लेट होणार आहे. 10 जूनपर्यंत मान्सून मुंबईत पोहचणे अपेक्षित होते, मात्र ‘वायू’ चक्रीवादळामुळे तो मुहूर्त हुकला असून आता 24 जूनपर्यंत लेट होणार असल्याचे ‘स्कायमेट’ने स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुंबईकरांना धुवांधार पावसासाठी आणखी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

केरळमध्ये आधीच मान्सून उशिरा दाखल झाल्याने मुंबईतही 7 जूनचा मुहूर्त हुकला आहे. त्यांनतर 10 जूनला मुंबईत मान्सून मुंबईत दाखल होणे अपेक्षित होते, मात्र त्याआधीच अरबी सुमद्रात उसळलेल्या ‘वायू’ चक्रीवादळाचा झटका मान्सूनला बसला आहे. शुक्रवारी ‘वायू’ चक्रीवादळ ओमानच्या दिशेने सरकले असले तरी त्याचा परिणाम दक्षिण-पश्चिम मानसूनच्या वेगावर झाला आहे. त्यामुळे त्यांचे मुंबईतील आगमन लांबणीवर पडले आहे. सध्या मुंबईत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत असून पुढील 24 तासांत 40-50 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याचा अंदाज ‘स्कायमेट’ने वर्तवला आहे.

174 ट्रेन, 400 विमानांची उड्डाणे रद्द

‘वायू’ वादळाचा झटका लांब पल्ल्याच्या रेल्वे गाडय़ा आणि विमानाच्या उड्डाणांना बसला आहे. आतापर्यंत 174 ट्रेन रद्द केल्या असून 400 विमानांची उड्डाणेही रद्द करण्यात आली आहेत. सध्या वादळ पोरबंदरच्या पुढे गेले असले तरी गुजरातच्या किनारपट्टी परिसरात पुढील 24 तासांसाठी हायऍलर्ट देण्यात आला आहे.

मागील वर्षी तीन दिवस आधी आगमन झाले होते
मागील वर्षी तीन दिवस आधीच म्हणजे 29 मे रोजीच मुंबईत मान्सूनचे आगमन झाले होते. त्याआधी 2014 मध्ये 5 जून, 2015 मध्ये 6 जून तर 2016 मध्ये 8 जून रोजी मुंबईत मान्सूनचे आगमन झाले होते.