गुणवत्ता वाढीसाठी कोल्हापूर, सांगली, बीड पॅटर्न वापरणार; कृती आराखड्यासाठी वर्किंग ग्रुप स्थापन

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी आता कोल्हापूर, सांगली, बीडसारख्या जिल्ह्यांत राबवण्यात येणाऱ्या यशस्वी संकल्पना राबवण्यात येणार आहेत. यासाठी पालिकेच्या शिक्षण विभागाकडून घेतलेल्या एकदिवसीय शिबिरात संबंधित जिल्ह्यांकडून पालिकेला प्रेझेंटेशन सादर करण्यात आले. यावर कार्यवाही करण्यासाठी वर्किंग कमिटी स्थापन करण्यात आली असून ही कमिटी 15 दिवसांत आपला प्रकल्प अहवाल सादर करणार आहे. या अहवालानुसार पालिकेच्या शाळांत वर्षभर हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण सहआयुक्त अजित कुंभार यांनी दिली.

मुंबई महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि अत्याधुनिक सुविधा देण्यात येत आहेत. 27 प्रकारच्या शालेय वस्तू मोफत देण्यात येणार आहेत. त्यामुळे पालिका शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या वाढत असून गेल्या दोन वर्षांत सुमारे दीड लाख विद्यार्थी वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर आता विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी इतर जिल्ह्यांत वापरण्यात येणाऱया कोल्हापूर जिह्यातील ‘भुदरगड प्रज्ञाशोध पॅटर्न’सारखे उपक्रम पालिका शाळांसाठी वापरण्यात येणार आहेत. यासाठी पालिका शाळांतील शिक्षक, अधिकाऱयांसाठी एकदिवसीय शिबीर घेण्यात आले. यामुळे शिक्षक-अधिकाऱयांचा आत्मविश्वास वाढण्यास आणि प्रोत्साहन मिळण्यास मदत होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

मुंबईचा आदर्शही राज्यात राबवणार

इतर जिल्ह्यांप्रमाणे मुंबई महापालिका शाळांमध्ये अनेक अत्याधुनिक उपक्रम राबवले जात आहेत. मुलांना मोफत शैक्षणिक साहित्यासह ‘बेस्ट’चा प्रवास, डिजिटल वर्ग अशा संकल्पना राबवण्यात येत आहे. अशा अनेक महत्त्वाकांक्षी उपक्रमांचे प्रेझेंटेशन इतर जिल्ह्यासाठी या परिषदेत करण्यात आले. यानुसार मुंबई महापालिकेचा शिक्षण पॅटर्न राज्यातील इतर जिह्यांतही राबवण्यात येणार आहेत.

असा राबवणार उपक्रम

इतर जिल्ह्यांत गणित, इंग्रजी, विज्ञानासह भाषा विषयाचे आकलन सोप्या पद्धतीने होण्यासाठी नवनवीन पद्धती वापरण्यात येतील. यासाठी जादा तास, शिकवण्याच्या पद्धतीत बदल करण्यात येतील. यासाठी कृती आराखडा राबवून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले जातील. शिवाय पुढील वर्षी होणाऱया नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हेसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता  वाढवण्यासाठीदेखील प्रयत्न करण्यात येणार आहेत.