मुंबईत दोन दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्यामुळे आता पालिका रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात पडलेले खड्डे वेगाने बुजवणार आहे. यासाठी मास्टिक कुकरची संख्या वाढवणार आहे. सद्यस्थितीत 30 असणाऱ्या मास्टिक कुकरची संख्या 50 पर्यंत वाढवण्यात येणार आहे.
सततच्या पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडतात किंवा दुरूस्तीयोग्य रस्त्याची डागडुजी करावी लागते. पावसाळय़ादरम्यान रस्त्यांवर खड्डे पडल्यास ते बुजविण्याची कार्यवाही लवकरात लवकर करावी. विविध पर्यांयाद्वारे खड्डे, दुरुस्तीयोग्य रस्त्यांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर साधारणपणे 24 तासांच्या आत कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. याकडे दुर्लक्ष केल्यास दंडात्मक कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. तर आता पावसाचा जोर कमी झाल्याने वेगाने खड्डे बुजवण्यात येणार आहे. रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी विभागनिहाय प्रत्येकी तीन याप्रमाणे एकूण 72 मास्टिक कुकर मशीन उपलब्ध ठेवण्याच्या सूचना जुलैमध्ये कंत्राटदारांना देण्यात आल्या होत्या. प्रत्येक विभागात नऊ मीटरपेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यासाठी दोन मास्टिक कुकर आणि नऊ मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांसाठी एक मास्टिक कुकर याप्रमाणे मास्टिक कुकर वापरावे, असे स्पष्ट केले होते.
असा असतो मास्टिक कुकर
मुंबईत सद्यस्थितीत कुकर मशीनद्वारे रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात येत आहेत. यामध्ये उच्च दर्जाचे डांबर व अन्य मिश्रण वापरले जाते. हे डांबर गरम करून खड्डय़ांवर टाकले जाते. डांबर गरम करून ते खड्डे बुजवण्याच्या प्रक्रियेत वापरण्यासाठी 180 ते 200 डिग्री तापमान ठेवावे लागते तरच डांबर खड्डय़ांवर व्यवस्थित आणि मजबूत बसते. एका मास्टिक कुकरमध्ये 12 मेट्रिक टन डांबराचे मिश्रण ठेवण्याची क्षमता असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.