तीन महिन्यांच्या मुलाला मिळाली आई

326

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी तीन महिन्यांच्या मुलाचा ताबा त्याच्या आईकडे सोपवला. त्यामुळे आईला मोठा दिलासा मिळाला. आईपासून विभक्त झालेल्या वडिलाने त्या मुलाला बळजबरीने सोबत नेले होते.

रिना कनोजे असे आईचे तर, योगेश असे वडिलाचे नाव असून ते अकोला जिह्यातील रहिवासी आहेत. मुलाला न्यायालयात आणण्याचा आदेश दोन दिवसांपूर्वी देण्यात आला होता. त्यानुसार मूर्तिजापूर पोलिसांनी मुलाला त्याच्या आईवडिलासह न्यायालयात आणले. त्यानंतर न्यायालयाने मुलाला तात्पुरत्या स्वरूपात आईच्या स्वाधीन करण्यास सांगितले. तसेच, योगेश कनोजे, अकोला पोलीस अधीक्षक व मूर्तिजापूरचे पोलीस निरीक्षक यांना यावर उत्तर सादर करण्यासाठी एक आठवडयाची मुदत वाढवून दिली. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

रिना कनोजे यांनी मुलाचा ताबा व पाच लाख रुपये भरपाई मिळण्यासाठी रिट याचिका दाखल केली होती. तिची एक विनंती तात्पुरती पूर्ण झाली. रिनाने योगेश व सासू-सासरे हुंडय़ासाठी छळ करीत असल्याची तक्रार मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. त्यासंदर्भातील खटला मूर्तिजापूर येथील फौजदारी न्यायालयात प्रलंबित आहे. दरम्यान, दोन्ही पक्षकार पोलीस ठाण्यातील महिला कक्षात उपस्थित असताना रिनाच्या ताब्यात असलेल्या मुलाला योगेश बळजबरीने सोबत घेऊन गेला होता. त्यावेळी मुलगा केवळ दोन महिन्यांचा होता. उच्च न्यायालयात याचिकाकर्तीतर्फे ऍड. संतोष चांडे व ऍड. राजू कडू यांनी कामकाज पाहिले.

आपली प्रतिक्रिया द्या