आज मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड बंद

1

सामना प्रतिनिधी । मुंबई

सकल मराठा क्रांती मोर्चाने आज बुधवारी मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड बंदची हाक दिली आहे. दादर येथील राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संभाजीनगर येथे सोमवारी पुकारण्यात आलेल्या जलसमाधी आंदोलनादरम्यान काकासाहेब शिंदे या आंदोलक तरुणाचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाला. त्या घटनेच्या निषेधार्थ सकल मराठा क्रांती मोर्चाने आज ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला होता. मुंबई व आसपासचा परिसर त्यातून वगळण्यात आला होता. त्या ठिकाणी उद्या बंद पाळला जाणार आहे.

बंदच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलिसांच्या बरोबर एसआरपीएफ, क्यूआरटी, राखीव पोलीस बलाचे जवान तैनात असणार आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली. उद्याच्या बंदमधून शाळा, महाविद्यालये यांना वगळण्यात आले असून शाळेच्या बसेस, दुधाच्या गाडय़ा, रुग्णवाहिका अडवल्या जाणार नाहीत.