मुंबईत 1510 नवे कोरोनाबाधित! 54 जणांचा मृत्यू, एकूण रुग्णसंख्या 38 हजार 220 वर

644

मुंबईत गेल्या 24 तासांत 1510 नवीन कोरोनाबाधित नोंदवले गेले आहेत. तर प्रलंबित 14 रिपोर्टसह एकूण 54 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकूण कोरोना रुग्णांची संख्या 38 हजार 220 आणि मृतांची एकूण संख्या 1227 वर पोहोचली आहे.

मुंबईत मृत्यू झालेल्या 54 जणांमध्ये 31 पुरुष आणि 23 महिलांचा समावेश आहे. शिवाय मृतांमधील 39 जणांना काही दीर्घकालीन आजार होते. शिवाय 28 जणांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त आणि 26 रुग्णांचे वय 40 ते 60 वर्षे होते. दरम्यान, मुंबईत गेल्या एकाच दिवसांत 356 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे एकूण कोरोनामुक्त होणार्‍यांची संख्या 16 हजार 364 झाली आहे. दरम्यान, विविध रुग्णालयात अत्यवस्थ असलेल्या 38 रुग्णांवर टोसिलिझुमॅब औषधाचा वापर केल्याने त्यांचीही प्रकृती सुधारली असून यातील सात जणांना घरी सोडण्यात आले आहे.

शीव रुग्णालयात 90 वर्षीय वृद्धेची कोरोनावर मात
पालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वसाधारण शीव रुग्णालयात कोरोनाबाधित 90 वर्षीय वृद्धेने कोरोनावर मात केली आहे. या महिलेला उच्च रक्तदाब, श्वास घेण्यास त्रास, ऑक्सिजन पातळी 84 पेक्षा कमी व क्ष-किरण चाचणीत दोष अशा समस्या होत्या. मात्र शीव रुग्णालयात ऑक्सिजन, अँटिबायोटिक, स्टेओराईड असे उपचार केल्यामुळे तिने कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. शिवाय एक 57 वर्षांची वयोवृद्धाही शीव रुग्णालयात कोरोनामुक्त झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या