उपचारासाठी आलेल्या महिलेसोबत नकोसे कृत्य केल्याच्या आरोपाखाली हाडवैद्याला दहिसर पोलिसांनी अटक केली. मालिश करताना त्याने महिलेसोबत नकोसे कृत्य केले. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद करून हाडवैद्याला अटक केली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.
तक्रारदार महिला या दहिसर येथे राहतात. त्यांना पायासंबंधी दुखण्याचा त्रास आहे. त्यामुळे त्या दहिसरच्या रावळपाडा येथील एका हाडवैद्याकडे गेल्या होत्या. गेल्या आठवड्यात महिलेला जास्त त्रास होऊ लागल्याने त्या त्याच्याकडे गेल्या. पाठीवर मालिश करून त्याने पाठीमध्ये गॅप असल्याचे महिलेला सांगितले. त्यानंतर त्याने पुन्हा मालिश करावे लागेल असे महिलेला सांगितले. त्यावर विश्वास ठेवून महिला त्याच्याकडे गेली.
मालिश करताना त्याने नस दबली गेल्याचे सांगून मालिश करणे गरजेचे असल्याचे भासवले. तेव्हा पायाला काही दुखापत नसल्याचे महिलेने सांगितले. त्याने मालिशच्या बहाण्याने नकोसे कृत्य केले. त्या कृत्यामुळे महिला घाबरली. तिने याची माहिती तिच्या पतीला दिली. त्यानंतर महिलेने दहिसर पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीची पोलिसांनी दखल घेतली.
दहिसर पोलिसांनी गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद होताच पोलिसांनी हाडवैद्याला अटक केली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते. पोलीस त्या दवाखान्यामधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेणार आहेत. त्याने उपचाराच्या नावाखाली अन्य महिलांसोबत असे कृत्य केले आहे का याचा तपास दहिसर पोलीस करत आहेत.