नाईट लाईफचा निर्णय बुधवारच्या कॅबिनेटमध्ये, गृह मंत्री अनिल देशमुख यांची माहिती

472
anil-deshmukh-new

मुंबईत 26 जानेवारीपासून बीकेसी, काळा घोडा, नरीमन पॉइंट येथे ‘नाईट लाईफ’ला सुरुवात होणार आहे. मात्र ‘नाईट लाईफ’ सुरू करायची झाल्यास त्याचा पोलिसांवर किती ताण येईल, कायदा-सुव्यवस्थेवर काय परिणाम होईल याचा आढावा घ्यावा लागेल. त्यामुळे यावर बुधवारी होणाऱया कॅबिनेट मीटिंगमध्ये चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया गृह मंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

दिवसाचे 24 तास धावणाऱया मुंबईत नागरिकांना सर्व सुविधा दिवस-रात्र मिळाव्यात यासाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी ‘नाईट लाईफ’ची संकल्पना मांडली. याविषयीचा कायदाही राज्य सरकारने केला आहे. याबाबत आदित्य ठाकरे यांनी पोलीस अधिकारी तसेच उद्योजकांची बैठक घेऊन 26 जानेवारीपासून नाईट लाईफ प्रायोगिक तत्त्वावर सुरू करणार असल्याची घोषणा केली. याबाबत गृह मंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया देताना ‘नाईट लाईफ’ सुरू करताना त्यासाठी यंत्रणा पुरेशी आहे की नाही, पोलिसांचे कामाचे 12 तास असताना त्यांना या डय़ुटींचे नियोजन कसे करता येईल, याचा आढावा घेण्यात येणार असून अंतिम निर्णय कॅबिनेटमध्ये घेतला जाईल.

मुंबईत नाईट लाईफ सुरू झालेच पाहिजे!

मुंबईत मोठय़ा प्रमाणावर परदेशी पर्यटक येत असतात. त्यांच्यात या नाईट लाईफचे आकर्षण आहे. त्यामुळे या शहरात नाईट लाईफ सुरू झालीच पाहिजे. यामुळे रोजगारही वाढणार आहेत. त्यामुळे यावर लवकरात लवकर निर्णय घेणार असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले.

प्रकाश आंबेडकर यांचा नाईट लाईफला पाठिंबा

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या ‘नाईट लाईफ’ या संकल्पनेचे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी समर्थन केले आहे. मी नाईट लाईफच्या जगातच मोठा झालो आहे. ज्यांना मुंबईची माहिती नाही तेच याला विरोध करत आहेत, असे आंबेडकर म्हणाले. नाईट लाईफ एका विशिष्ट वर्गासाठी आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या