अक्षयचा ‘सूर्यवंशी’ रात्रभर जागा राहणार! मुंबईच्या ‘नाईट लाइफ’मधील पहिला चित्रपट

1379

अक्षय कुमारचा बहुचर्चित ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट दिवसातले 24 तास पाहता येणार आहे. येत्या 24 मार्चला सायंकाळी 6 वाजता हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या दिवसापासूनच मुंबईतील सर्व चित्रपटगृहे दिवसरात्र म्हणजे 24 तास सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे ‘सूर्यवंशी’ हा बॉलीवूडमधील पहिला चित्रपट ठरला आहे ज्याचे शो दिवसरात्र चालणार आहेत.

सिंघम सीरीजमधील सिंबानंतर रोहित शेट्टीचा ‘सूर्यवंशी’ हा नवा चित्रपट आहे. या चित्रपटात अक्षयकुमार आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहेत. सुरुवातीला हा चित्रपट 27 मार्चला प्रदर्शित होणार होता, पण आता तो 24 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या बातमीने अक्षयकुमार आणि रोहित शेट्टीचे चाहते खूप खूश झाले आहेत. अक्षयकुमारसह रोहित शेट्टी, अजय देवगण आणि रणवीर सिंहने ट्विटरवरून याविषयीची माहिती चाहत्यांना दिली. ट्विटरवर त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला असून ज्यामध्ये लहान मुले या चित्रपटाच्या ‘रिलीज डेट’ची घोषणा करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये दाखविण्यात आले आहे की, 24 मार्चपासून मुंबईतील सर्व चित्रपटगृहे 24ग7 सुरू राहणार आहेत. याचा अर्थ असा आहे की, सूर्यवंशी हा पहिला चित्रपट आहे की जो मुंबईकरांना 24 तासांत कधीही पाहता येईल.

ईद नाही, आता पाडव्याचा मुहूर्त

सुरुवातीला ‘सूर्यवंशी’ ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होता, पण सलमान खानचा चित्रपटही ईदलाच प्रदर्शित होणार असल्याने निर्मात्यांनी ‘सूर्यवंशी’ दोन महिने आधी 27 मार्चला प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. जगभरात हा चित्रपट 24 मार्चलाच प्रदर्शित होणार आहे. गुढीपाडव्याची सुट्टी लक्षात घेऊन हा पहिलाच बॉलीवूड चित्रपट प्रदर्शित होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या