… म्हणून पंत पुन्हा मैदानात उतरला नाही, राहुलकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी

4863

मुंबईतील वानखेडे मैदानावर टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 255 धावा केल्या. टीम इंडियाकडून शिखर धवनने सर्वाधिक 74 आणि के.एल. राहुल याने 47 धावांची खेळी केली. टीम इंडियाने दिलेल्या 256 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी डेव्हीड वॉर्नर आणि अॅरॉन फिंच सलामीला मैदानात उतरले. दुसरीकडे क्षेत्ररक्षणासाठी उतरलेल्या हिंदुस्थानच्या संघात ऋषभ पंत दिसला नाही. पंतच्या जागी के.एल. राहुल ग्लोव्हज घालून मैदानात उतरला. त्यामुळे पंतला नक्की काय झाले याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे बीसीसीआयने ट्विटरवर याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

टीम इंडियाची फलंदाजी सुरु असताना ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याचा एक चेंडू पंतच्या बॅटची कडा घेऊन हेल्मेटवर आदळला. डावाच्या 44 व्या षटकात पंत बाद झाल्यानंतर त्याने सावधगिरी म्हणून डॉक्टरकडे तपासणी केली. यानंतर तो ऑस्ट्रेलिच्या फलंदाजीवेळी मैदानात उतरला नाही. त्याच्या ऐवजी के.एल. राहुलकडे ही अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे, असे ट्वीट बीसीसीआयने केले आहे.

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर राहुल आणि शिखरने हिंदुस्थानचा डाव सावरला. दोघांमध्ये 100 धावांची भागिदारी झाली. परंतु दोघेही एकापाठोपाठ बाद झाल्यानंतर टीम इंडियाचा एकही फलंदाज मैदानात टिकून मोठी खेळी करू शकला नाही. ऋषभ पंतही अवघ्या 28 धावांचे योगदान देऊन माघारी परतला.

आपली प्रतिक्रिया द्या