सुनांपेक्षा मुलांकडूनच पालकांचा अधिक छळ

सामना ऑनलाईन । मुंबई

घरोघरी मातीच्या चुली असं म्हटल जातं. त्यातही सासू- सुनेच नातं म्हणजे विळी-भोपळ्याचं. पण हेल्पएज इंडिया या ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात सुनांपेक्षा मुलगेच आई वडिलांचा अधिक छळ करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध जागृती दिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात संस्थेनेच हा सर्वेक्षण अहवाल सार्वजनिक केला आहे.

या अहवालानुसार सध्या देशभरात 71 टक्के ज्येष्ठ नागरिकांना घरगुती हिंसाचाराला सामोरे जावे लागत आहे. यात मुलाकडून आईवडीलांना शिवीगाळ करणे, प्रसंगी आई वडीलांना धक्काबुक्की करणे, संपत्तीवरून धमकावणे, घालून पाडून बोलणे याचे प्रमाण 51 टक्के आहे. तर सुनांकडून सासू सासऱ्यांचा छळ होण्याचे प्रमाण 38 टक्के आहे. हेल्पएजच्या या अहवालामुळे समाजासमोर मुलांचा कधीही समोर न आलेला चेहराच समोर आला आहे. यामुळे सासू सासऱ्यांचा छळ फक्त सुनाच करतात हा सर्वात मोठा गैरसमज असल्याचे तज्ज्ञांच्या निदर्शनास आले आहे.

यास संस्थेचे अध्यक्ष प्रकाश बोरगावकर यांनीही दुजोरा दिला आहे. तसेच अशा प्रकारच्या अनेक केसेस संस्थेकडे येतात असेही त्यांनी सांगितले असून अशी प्रकरणे खूप सामंजस्याने हाताळावी लागतात, असेही त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर समाजाच्या प्रवाहाबरोबर ज्येष्ठांनीही आपली जुनी विचारसरणी बदलणे आवश्यक असल्याचा सल्लाही बोरगावकर यांनी दिला आहे.