कोणत्याही संकटात खाकी मदतीसाठी तत्पर, ऑनड्युटीत असतानाही 14 वर्षाच्या मुलीसाठी केले रक्तदान

750

 ‘निसर्ग’ वादळ धडकणार या वृत्ताने मुंबईत बुधवारी घबराटीचे वातावरण पसरले होते. या संकटातही पोलीस मात्र निधड्या छातीने नागरिकांच्या सुरक्षेसाठी इन अ‍ॅक्शन होते. असे सर्व चित्र असतानाच ताडदेव ‘ल’ विभागात कार्यरत असलेल्या आकाश गायकवाड यांचा फोन खणखणला आणि हिंदुजा हॉस्पिटलमध्ये 14 वर्षाच्या मुलीला ए पॉझिटिव्ह रक्ताची गरज असल्याचे सांगण्यात आले. ऑनड्युटी असतानाही आकाश यांनी हिंदुजा हॉस्पिटल गाठून रक्तदान केले.

कुठलेही संकट किंवा समस्या असो जनतेसाठी पोलिस  तेथे हजर असतोच. हेच आकाश गायकवाड यांनी गुरूवारी दाखवून दिले. ताडदेव ‘ल’ विभागात कार्यरत असणा्रया आकाश यांची डयुटी गुरूवारी भायखळा स्ट्राँगरूम येथे होती. बंदोबस्तासाठी तैनात असताना आकाश यांना त्याचा पोलिस सहकारी मोईन मुजावर यांचा फोन आला. हिंदूजा हॉस्पिटलमध्ये सनाफातिम खान या 14 वर्षीय मुलीची अचानक ओपनहार्ट सर्जरी करायची असून त्यासाठी ज पॉझिटिव्ह रक्ताची गरज असल्याचे मुजावर यांनी सांगितले. आकाश यांनी लगेच वरिष्ठांची परवानगी घेऊन हिंदुजा हॉस्पिटल गाठले. सनाफातिम हिच्यासाठी रक्तदान केले आणि लगेच पुन्हा आपल्या डयुटीवर हजर झाले. आकाश हे अंमलदार असून मुंबई पोलिस दलाचे शरीरसौष्ठवपटू आहेत.

हे पण कर्तव्यच

14 वर्षाच्या मुलीला रक्ताची तत्काळ गरज असल्याचे सांडण्यात आल्यावर मी बाकी कसलाही विचार केला नाही. कोरोनाच्या भीतीपोटी कोणी हॉस्पिटलमध्ये जाणार नाही हीदेखील शक्यता होती. त्यामुळे मीच हॉस्पिटलला जाऊन रक्तदान केले. संकट कोणतेही असो सदैव तत्पर राहणे आणि नागरीकांच्या मदतीला जाणे हेच पोलिसांचे कर्तव्य असून तेच मी केले. दर सहा महिन्याने मी रक्तदान करतो असे आकाश यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या