ठाणे शहर व जिह्यात वादग्रस्त ठरलेल्या अत्यंत अकार्यक्षम अशा उपायुक्तांच्या मुंबईत क्रीम व मोक्याच्या ठिकाणी कार्यक्षम अशा आयपीएस अधिकाऱ्यांची उचलबांगडी करून नियुक्त्या करण्यात आल्याने साऱ्या पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी शुक्रवारी 15 उपायुक्तांची पदस्थापना केली. निवडणूक आयोगाचा हवाला देऊन ठाणे शहर व जिह्यातून मुंबईत बदलून आलेल्या बहुसंख्य उपायुक्तांना क्रीम व मोक्याच्या पोस्टिंग देण्यात आल्या आहेत. पॅडर पोस्ट असलेल्या पदावर सहसा नॉन कॅडर अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येत नाही; परंतु मुख्यमंत्र्यांचे ‘ब्ल्यू आईड बॉय’ मर्जीतील अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वादग्रस्त अधिकाऱ्यांची कॅडर पोस्टवर नियुक्ती करण्यात आली आहे. अत्यंत प्रामाणिक अशी पोलीस दलात प्रतिमा असलेल्या काही आयपीएस अधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपण्याच्या आधीच त्यांच्या अडगळीत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे काही अधिकारी न्यायालयात धाव घेणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली.
n ठाण्यातून मुंबईत बदलून आलेले तीन उपायुक्त तर पोलीस दलात ‘लुटारू’ म्हणून ओळखले जातात. त्यामुळे मुंबई पोलिसांचा लौकिक रसातळाला जाणार आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, गँगवॉर पुन्हा उफाळून आले तर हे वादग्रस्त अधिकारी मुंबईत शांतता प्रस्थापित करू शकणार नाहीत, अशी भीती मुंबई पोलीस दलातील अनुभवी अधिकारी व्यक्त करीत आहेत. निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घ्यावी, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले. येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील अकार्यक्षम उपायुक्तांना मोक्याच्या ठिकाणी पोस्टिंग देण्यात आल्याने पोलीस दलात शंका व्यक्त करण्यात येत आहे.