
राज्यात कोरोनाचा धोका पुन्हा वाढू लागलाय. कोरोनाशी लढायचं असेल तर वारंवार हात धुणे अनिवार्य आहे. स्वच्छतेच्या सवयींची नागरिकांना पुन्हा एकदा आठवण करून देण्यासाठी मुंबई पोलिसांनी नुकत्याच केलेल्या भन्नाट ट्विटची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. अग्निपथमधील आई-मुलावर चित्रित झालेल्या एका दृश्याचा आधार घेत मुंबई पोलिसांनी दिलेला स्वच्छतेचा संदेश नागरिकांच्या पसंतीस उतरतोय.
नुकतीच पोलिसांनी अमिताभ बच्चन यांच्या अग्निपथ या लोकप्रिय चित्रपटातील 45 सेकंदांची एक क्लिप शेअर केली आहे. त्यात बिग बी आपल्या बहिणीसह डायनिंग टेबलवर बसलेले दिसतायत. चित्रपटात बिग बी यांच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी त्यांना जेवणापूर्वी हात धुण्यास सांगताना दिसतेय. या दृष्याचा आधार घेत कोरोनापासून बचाव करण्यासाठी हात धुणे किती महत्त्वाचे आहे याचे महत्त्व पोलिसांनी पटवून दिले आहे. ’क्या आपने कभी जानने की कोशिश की, कि मॉं को क्या पसंद है’ असे कॅप्शन पोलिसांनी हा व्हिडिओ शेअर करताना दिले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 36 हजारांहून अधिक क्ह्यूज आणि 6500 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत.