मुंबई पोलिसांच्या श्वान पथकांचा गारेगार प्रवास, श्वानांकरिता बनवले विशेष वाहन

>> मंगेश सौंदाळकर

मुंबई पोलिसांच्या बॉम्बशोधक व नाशक पथकातील (बीडीडीएस) श्वानांचा आता गारेगार प्रवास होणार आहे. श्वानांना ने-आण करण्यासाठी दोन विशेष वाहने मुंबई पोलिसांच्या ताफ्यात दाखल झाली आहेत. श्वानांना बसण्यासाठी आरामदायी सीट असणार आहे. त्यामुळे श्वानांचे आयुष्यमान वाढणार आहे.

मुंबई पोलीस दलात ‘बीडीडीएस’ची महत्त्वाची भूमिका आहे. व्हीआयपींचे दौरे किंवा महत्त्वाच्या सभांच्या काही तास अगोदर या श्वानांना तेथे नेले जाते. एखादा बॉम्बच्या अफवेचा फोन पोलीस नियंत्रण कक्षात आल्यास ‘बीडीडीएस’च्या पथकाला शहरातून उपनगरात जाताना वाहतूककोंडीचा फटका बसतो. खासकरून मार्च ते जून या काळात वातावरणात अधिक उष्णता असल्याने मोठय़ा गाडय़ांमधून श्वानांना नेताना ते त्रासदायक ठरते. सध्या मुंबई पोलिसांकडे श्वानांना ने-आण करण्याकरिता सात छोटय़ा गाडय़ा आहेत, पण त्या गाडय़ा कमी पडत आहेत. नुकतेच मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी विशेष वाहनाकरिता वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांशी चर्चा केली. अतिरिक्त पोलीस आयुक्त अतुल पाटील यांना वाहनाच्या डिझाईन करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार या विशेष वाहनाचे डिझाईन करण्यात आले आहे. या वाहनांना ‘के 9’ असे नाव देण्यात आले आहे.

असे असेल विशेष वाहन
पोलिसांच्या गस्ती वाहनांप्रमाणे हे विशेष वाहन असेल. या वाहनामध्ये एसीची सुविधा असणार आहे. मध्यभागी श्वानांना बसण्याकरिता खास सीट बनवली आहे. तसेच बॉम्बशोधक व नाशकसाठी लागणारे साहित्य ते या वाहनातून नेतील. वाहनामध्ये 45 लिटर पाण्याची टाकी बसवली आहे. पोलीस कर्मचाऱयांना बसण्यासाठी मागे विशेष व्यवस्था केली आहे. घटनास्थळी जाऊन पोलीस तेथून माहितीची सहज देवाण-घेवाण करतील.

‘बीडीडीएस’च्या श्वानांकरिता दोन विशेष वाहने तयार केली आहेत. आणखी दोन वाहने लवकरच मुंबई पोलिसांच्या ताफ्यात येणार आहेत. या वाहनांमुळे श्वानांचे आयुष्यमान वाढेल.
n संजय बर्वे, मुंबई पोलीस आयुक्त

आपली प्रतिक्रिया द्या