स्टार मिळाले,पण मुंबईबाहेर पोस्टिंग नको; उपनिरीक्षक झालेल्या 177 जणांची आर्जव

खांद्यावर दोन स्टार मिळाल्याचा आनंद असला तरी मुंबईबाहेर पोस्टिंग झाल्याने शहरातील 177 उपनिरीक्षक हवालदिल झाले आहेत. परंतु या 177 जणांच्या नाराजीची पोलीस आयुक्त परमबिर सिंग यांनी दखल घेत थेट पोलीस महासंचालकांना पत्र लिहले आहे.

ज्यांना उपनिरीक्षकपदी पदोन्नती मिळाली आहे अशा मुंबईतील अंमलदारांना मुंबईतच कायम ठेवण्याची पत्राद्वारे विनंती केली आहे. 2013 साली अर्हता परिक्षा उत्तीर्ण झालेल्या राज्यातील 1061 अंमलदार व सहाय्यक फौजदारांना महासंचालक कार्यालयाने नुकतीच उपनिरीक्षकपदी पदोन्नती दिली.

पदोन्नती देण्यापूर्वी प्रत्येक पोलीस अंमलदारांकडून बदलीसाठी महसूल संवर्ग मागविला होता. त्यानुसार मुंबईतील सर्व पदोन्नतीधारकांनी कोकण-2 संवर्ग दिला होता.या संवर्गात मुंबई पोलीस आयुक्तालयाचा समावेश आहे.

मुंबई पोलीस आयुक्तालयात उपनिरीक्षकांची 2300 पदे रिक्त असतानाही मुंबई पोलीस दलातील 177 पोलीस अंमलदारांना उपनिरीक्षकपदी पदोन्नती देऊन त्यांची नागपूर शहर, संभाजीनगर शहर, संभाजीनगर रेल्वे आणि ठाणे परिक्षेत्र या ठिकाणी पोस्टिंग दाखवल्या आहेत. यामधील अनेक जण निवृत्तीच्या उंबरठय़ावर आहेत. तर बरेच जण विविध आजाराने ग्रस्त आहेत.

त्यामुळे या सर्वांनी मुंबई बाहेर झालेल्या बदलीला विरोध केला असून ही बदली थांबवावी अशी विनंती मुंबई पोलीस आयुक्तांना केली. याची दखल घेत मुंबई पोलीस आयुक्तांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहून मुंबईतील 177 पदोन्नतीने उपनिरीक्षक झालेल्यांना मुंबईतच कायम करावे अशी विनंती केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या