रंगांचा बेरंग करणाऱ्यांवर होणार कारवाई

फोटो-ANI

सामना ऑनलाईन । मुंबई

‘बुरा न मानो होली है…’ असं म्हणत रंग लावताना थोडं सावधान! कारण रंगाचा बेरंग झाला तर तुमच्यावर कडक कारवाई केली जाऊ शकते. संपूर्ण राज्यभर होळीच्या उत्सवाची तयारी जोरदार सुरू आहे, बाजारपेठाही या सणासाठी सज्ज झाल्या आहेत. १२ मार्च ते १७ मार्च या काळात होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी असे सण साजरे केले जाणार आहेत. या सणांसाठी मुंबई पोलिसांनीही खास तयारी केली आहे.

सणाच्या काळात वाद होऊ नये, शांतता राखली जावी म्हणून मुंबई पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ अन्वये काही प्रतिबंध घातले आहेत आणि अशा लोकांवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबईचे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी दिली.

धूलिवंदन आणि रंगपंचमीच्या दिवशी काही नागरिकांकडून कोणत्याही गोष्टींचं तारतम्य न बाळगता अंगावर रंग उडवले जातात, महिलांना पाहून अश्लिल भाषेत शेरेबाजी केली जाते किंवा अश्लिल गाणी लावली जातात. अनोळखी व्यक्ती आणि महिलांवर पाण्याचा फवारा उडवला जातो किंवा अंगावर रंग टाकला जातो. तर काही लोकं पाण्यानं अथवा रंगांनी भरलेले फुगे फेकून मारतात. त्यामुळे रंगांचा बेरंग होऊन सामाजिक एकोपा आणि सामान्यांच्या भावना दुखावल्या जाऊन वाद होण्याची शक्यता असते. त्यामुळे असे प्रकार टाळण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.