मुंबई ते पुणे रेल्वेमार्ग 16 ऑगस्टपासून सुरू करण्याचा प्रयत्न

574

अतिवृष्टीने कर्जत ते लोणावळा घाट सेक्शनमध्ये दरड कोसळण्याच्या तसेच भूस्खलनाच्या घटनांमुळे गेल्या काही दिवसांपासून बंद असलेला मध्य रेल्वेचा मुंबई ते पुणे रेल्वेमार्ग 16 ऑगस्टपासून सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

मध्य रेल्वे हा मार्ग पूर्ववत करण्यासाठी दिवसरात्र काम करीत आहे. मंगळवारी या अभियांत्रिकी कामांचा आढावा मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार गुप्ता आणि वरिष्ठ अधिकाऱयांनी घेतला. कामांचा आढावा घेतल्यानंतर 16 ऑगस्टपासून या मार्गावरील रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्न असल्याचे सूतोवाच करण्यात आले आहे.

जुलैच्या प्रारंभी आणि अखेरीस कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे कर्जत ते लोणावळा तसेच नागनाथ, मंकी हिल आणि ठाकूरवाडी आदी भागांत रेल्वेच्या मालमत्तेची मोठी हानी झाली. रुळांवर पाणी तसेच मुरुमाची माती साचण्याबरोबरच सातत्याने दरड कोसळण्याच्या घटना घडल्याने प्रचंड हानी झाली आहे. दरड कोसळत असलेल्या ठिकाणी रेल्वेकडून संरक्षक भिंत, जाळ्या उभारण्यासह अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. तर उखडलेल्या सिग्नल यंत्रणा, रूळ आणि ओव्हरहेड वायरचीही कामे केली जात आहेत.

चार दिवसांत दोनदा भेट
कर्जत ते लोणावळा घाट क्षेत्रातून रेल्वे गाडय़ांना वेगावर मर्यादा असते. मात्र गेल्या काही दिवसांत दरड कोसळण्याच्या घटनांमुळे गाडय़ांच्या वेगावर आणखी मर्यादा येणार आहे. रेल्वे मंत्रालयाने हा मार्ग पूर्ववत करण्याचे आदेश दिल्याने गेल्या चार दिवसांत दोनदा महाव्यवस्थापक गुप्ता यांनी येथे भेट दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या