मधवालच्या पंचने लखनौ गारद, एलिमिनेटर लढतीत मुंबईची बाजी

मुंबई इंडियन्सने 182 या असुरक्षित वाटणाऱ्या धावसंख्येचा यशस्वी बचाव करताना लखनौ सुपर जायन्ट्सला 16.3 षटकांत 101 धावसंख्येवर गुंडाळून 81 धावांनी दणदणीत विजय मिळविला. या विजयासह मुंबईने एलिमिनेटर लढतीत बाजी मारत क्वालिफायर-2 लढतीतील स्थान निश्चित केले. आकाश मधवालने 5 बळी टिपत मुंबईच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सामनावीराची माळ अर्थातच मधवालच्या गळ्यात पडली. आता क्वालिफायर-2 लढतीत मुंबईपुढे गुजरात टायटन्सचे आव्हान असेल.

मुंबईकडून मिळालेल्या 183 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौच्या फलंदाजांनी साफ निराशा केली. त्यांच्याकडून मधल्या फळीतील मार्कस स्टोईनिसने सर्वाधिक 40 धावांची खेळी केली, तर कायल मायेर्स (18) व दीपक हुडा (15) हे इतर दुहेरी धावा करणारे फलंदाज ठरले. मुंबईकडून आकाश मधवालने 3.3 षटकांत केवळ 5 धावांच्या मोबदल्यात 5 बळी टिपले. ख्रिस जॉर्डन व पियूष चावला यांनी 1-1 गडी बाद केला.

दरम्यान, नाणेफेकीचा काwल जिंकून प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 8 बाद 182 धावसंख्या उभारली. इशान किशन (15) व कर्णधार रोहित शर्मा (11) ही सलामीची जोडी लवकर बाद झाली. त्यानंतर पॅमेरॉन ग्रिन (41) व सूर्यकुमार यादव (33) यांनी तिसऱया विकेटसाठी 38 चेंडूंत 66 धावांची भागीदारी केली. हे दोघे बाद झाल्यानंतर तिलक वर्मा (26) व टिम डेव्हिड (11) यांना फारशी करामत करता आली नाही. नवीन उल-हकने रोहितसह ग्रिन, सूर्यकुमार व तिलक यांना बाद करून मुंबईच्या फलंदाजीला भगदाड पाडत लखनौला मोठे यश मिळवून दिले. मग नेहाल वढेराने 12 चेंडूंत 2 षटकार व 2 चौकारांसह 24 धावा फटकाविल्याने मुंबईला 8 बाद 182 धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. यश ठाकूरनेही इशान किशन, टिम डेव्हिड व नेहाल वढेरा हे महत्त्वाचे बळी टिपले, तर मोहसीन खानने एक गडी बाद केला.