मुंबईच्या नायर रुग्णालयात पुन्हा रॅगिंग, पीडिता पुन्हा ‘तडवी’च

1434
nair

मुंबईतील नायर रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या पायल तडवी या विद्यार्थिनीने रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केली होती. या घटनेला चार महिने झाले असताना नायर रुग्णालयात पुन्हा एकदा रॅगिंगचे नवीन प्रकरण समोर आले आहे. योगायोग म्हणजे यावेळीही रॅगिंगचा आरोप करणार्‍या डॉक्टरचे नाव तडवी असे आहे.

इंग्रजी वृत्तपत्र मुंबई मिररने दिलेल्या माहितीनुसार, रॅगिंगचा आरोप करणार्‍या महिला डॉक्टरचे नाव डॉ. सादिया शेख तडवी असे आहे. तडवी पोस्ट ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. सादियाने आपल्या वरिष्ठ डॉ. रेश्मा बांगर यांच्यावर आपला छळ केल्याचा आरोप केला आहे. 12 सप्टेंबर रोजी सादिया आणि डॉ.बांगर यांच्यात भांडण झाले होते. यानंतर सादियाने डॉ.बांगर यांना तुमची वरिष्ठांकडे तक्रार करणार असे सांगितले. डॉ.पायल तडवी यांच्या आत्महत्येची घटना ताजी असल्याने डॉ.बांगर या घाबरल्या आणि त्यांनी स्वतःला खोलीत कोंडून घेतले. या घटनेने संपूर्ण रुग्णालयात खळबळ उडाली होती. इतर वरिष्ठ डॉक्तरांनी बराच काळ डॉ. बांगर यांची समजूत काढल्यानंतर त्यांनी आपल्या खोलीचे दार उघडले.

दरम्यान, 17 सप्टेंबर रोजी हे प्रकरण अँटी रॅगिंग कमिटीसमोर ठेवण्यात आले होते. डॉ. बांगर यांनी अँटी रॅगिंग कमिटीला सांगितले की, डॉ. तडवी त्यांच्याशी उद्धटपणे वागते आणि त्यानी दिलेली कामे करण्यास नकार देते. त्याचवेळी तडवी यांनी बांगर यांच्यावर कामाचे अति ताण देणे आणि छळ केल्याचा आरोप केला आहे.

रुग्णालयाचे डीन डॉ. रमेश भारमल यांनी गुरुवारी कबूल केले की, रुग्णालयात रॅगिंगचे नवे प्रकरण घडले आहे. ते म्हणाले, ‘दोघांनी एकमेकांविरोधात तक्रारी केल्या आहेत. हे एक लहान भांडण देखील असू शकते. परंतु भूतकाळातील घटना लक्षात घेता आम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. सध्या आम्ही हे प्रकरण अँटी रॅगिंग समितीकडे पाठविले आहे.’ अशी माहिती भारमल यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या