Mumbai Rain Update : गर्दीमुळे बेलापूर रेल्वे स्थानकात महिला लोकलखाली आली, जीव वाचला पण…

रविवारी मध्यरात्रीपासून ते सोमवार सकाळपर्यंत पडलेल्या मुसळधार पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडवली. अनेक भागात तसेच रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने मुंबईतील मध्य व हार्बर रेल्वेला त्याचा फटका बसला. आठवड्याचा पहिलाच दिवस असल्याने सर्व रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी होती. याचा फटका एका महिलेला बसला आहे. बेलापूर स्थानकावर एक महिला रेल्वेमधून पडून ट्रॅक खाली आली आहे. या अपघातात सदर महिलेचा जीव वाचला मात्र तिचे दोन्ही पाय कापले गेले आहेत.

हार्बर मार्गावर चुनाभट्टी स्थानकावर पाणी साचल्याने मानखुर्द ते वडाळ्या दरम्यान रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आलेली होती. त्यामुळे सर्व रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. बेलापूर स्थानकावर देखील प्रवाशांची गर्दी होती. दरम्यान सकाळी दहाच्या सुमारास सदर महिला प्लॅटफ़र्म नंबर 3 वरून ट्रेन पकडण्यासाठी आली होती. मात्र गर्दीत ट्रेन पकडताना तिचा पाय घसरला व ती लोकलखाली गेली. या अपघातात लोकल तिच्या पायावरून गेल्याने तिचे दोन्ही पाय कापले गेले आहेत. रोहिणी असे त्या महिलेचे नाव असून तिला उपचारासाठी बेलापूरच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.