मुंबई : 9 दिवसांत 3 महिने पुरेल इतका पाणीसाठा जमा

1076

जुलै महिन्यात पावसाने ओढ दिल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा जमा झाला नव्हता. ऑगस्ट महिन्यात मात्र आतापर्यंत चांगला पाऊस पडला असून फक्त 9 दिवसांत पावसाने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत 3 महिने पुरेल इतकं पाणी जमा केलं आहे. गुरुवारपर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांत मिळून 60 टक्के पाणीसाठा जमा झाला होता. गुरुवापर्यंत धरणांमध्ये 8 लाख 70 हजार दशलक्ष लिटरपेक्षा अधिक पाणीसाठा जमा झाला होता.

जुलै महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे मुंबईत सध्या 20 टक्के पाणीकपात सरू आहे. ही पाणी कपात चालू ठेवायची अथवा उठवायची याबाबतचा निर्णय पुढच्या महिन्यात धरणक्षेत्रात जमा झालेल्या पाण्याचा आढावा घेतल्यानंतर घेतला जाणार आहे. जुलै महिन्यात पुरेशा पावसाअभावी तलावांमध्ये अपेक्षित पाणीसाठा जमा झाला नव्हता. मुंबईला भविष्यात पाणीपुरवठा अव्याहतपणे करता यावा यासाठी मुंबईमध्ये पाणीकपात करण्याचा निर्णय 5 ऑगस्टला जाहीर करण्यात आला होता. 1 ऑगस्ट रोजी तलावात 5 लाख 1 हजार 160 दशलक्ष लिटर म्हणजे 34.63 दशलक्ष लिटर पाणीसाठा होता. गेल्या दहा बारा दिवसात तलावात 3 लाख 69 हजार 697 दशलक्ष लिटर पाण्याची भर पडली आहे. मुंबई महानगरपालिका दिवसाला 3850 दशलक्ष लिटर पिण्याचे पाणी मुंबईकरांना पुरवत असते. पुढच्या पावसाळ्यापर्यंत हा पुरवठा अव्याहत सुरू ठेवण्यासाठी तलावांमध्ये 14.5 लाख दशलक्ष लिटर पाणी असणे गरजेचे आहे.

मुंबईला पाणी पुरवठा करणारे दोन छोटे तलाव हे ओसंडून वाहायला लागले असले तरी ठाणे, पालघर आणि नाशिक जिल्ह्याच्या हद्दीत असलेले 5 मोठे तलाव अजून ओसंडून वाहिलेले नाहीत. सोमवारपर्यंत मुंबई, ठाणे, नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून तलावक्षेत्रातही दमदार पाऊस पडेल असा अंदाज आहे. पावसाचे प्रमाण असेल राहिले तर ऑगस्ट महिन्याच्या शेवटापर्यंत दिलासादायक चित्र निर्माण होऊ शकेल.

मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी रविवारी आणि सोमवारी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. या दोन दिवसांत बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढच्या आठवड्यातील उरलेल्या दिवसांसाठी यल्लो अलर्ट म्हणजेच काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आहे. गेल्या 24 तासात मुंबईमध्ये मुसळधार तर ठाण्यामध्ये अतिमुसळधार पाऊस पडल्याचे सांगण्यात आले आहे. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सकाळी पाऊस कमी असतो मात्र संध्याकाळनंतर त्याचा जोर वाढायला लागतो अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. गुरुवारी रात्री मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाली असून शुक्रवारी सकाळपासून मुंबई शहरात जोरजोरात पाऊस पडतो आहे.

आपली प्रतिक्रिया द्या