राजावाडी रुग्णालय कात टाकणार!

379

सीसीटीव्ही कॅमेरे, मॉडय़ुलर शस्त्रक्रियागृह, नवीन गॅस सिस्टीम अशा कामांसह दुरुस्ती आणि अद्ययावत सुविधांमुळे घाटकोपर येथील पालिकेचे राजावाडी रुग्णालय कात टाकणार आहे. यामध्ये रुग्णालयाची मुख्य इमारत, परिचारिका सदनिका-स्वयंपाकघर, सुरक्षा रक्षक कार्यालय यांचीही दुरुस्ती केली जाणार असून या कामासाठी पालिका 16.53 कोटी रुपयांचा खर्च करणार आहे.

पालिकेच्या रुग्णालयांमध्ये राज्याच्या कानाकोपऱयासह देशातूनही अनेक रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यामुळे रुग्णांना अद्ययावत आणि दर्जेदार सुविधा मिळण्यासाठी रुग्णालयांची दुरुस्ती, नवीन उपकरणे आणली जात असून विभागांचे अद्ययावतीकरणही करण्यात येत आहे. यामध्ये राजावाडी रुग्णालयाचे काम हाती घेण्यात आले असून या कामासाठी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. मे. बुकॉन इंजिनीयर्स ऍण्ड इप्रास्ट्रक्चर प्रा. लि. कडून हे काम केले जाणार आहे.

असे होणार काम

राजावाडी रुग्णालयाच्या दुरुस्तीकामांतर्गत इमारतीची संरचनात्मक दुरुस्ती, कॉलम जकेटिंग, पॉलिमर प्लास्टर, बिमसाठी मायक्रो काँक्रीट करणे, नविन दरवाजे-खिडक्या बसविणे, लेबर कॉर्ड, अतिदक्षता विभाग, शस्त्रक्रियागृह यांची दुरुस्ती करणे, रंगकाम करणे, लादीकरण, पर्जन्य जलवाहिन्या, मलनिस्सारण वाहिन्या बदलणे, पेव्हर ब्लॉक बसविणे, ग्रॅनाईट बेंच बसविणे, सौरऊर्जेवरील यंत्रणा वाढून नव्याने बसविणे, सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, नविन मेडिकल गॅस सिस्टीम बसविणे, चार साधारण शस्त्रक्रियागृहाचे रूपांतर मॉडय़ुलर शस्त्रक्रियागृहात करणे अशी कामे करण्यात येणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या