रत्नागिरीचे मासे नागपूरकर पळवणार?

सामना प्रतिनिधी । मुंबई

रत्नागिरीतील मत्स्य महाविद्यालय नागपूरच्या मत्स्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न करण्याच्या हालचाली सुरू आहेत. हे महाविद्यालय कोकण कृषी विद्यापीठाशीच संलग्न राहावे यासाठी शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांचा तसेच नॅशनल असोसिएशन फॉर फिशरमन फेडरेशनसह सातपाटीपासून रायगड, रत्नागिरी आणि थेट सिंधुदुर्गातील वेगववेगळ्या मच्छीमार संघांचा जनरेटा वाढत आहे. कोकणवासीयांच्या नाराजीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मत्स महाविद्यालय दापोलीतील डाँ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न ठेवण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दर्शविला असून पुढील आठवडय़ात होणाऱया राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

कोकणाला लाभलेला समुद्र किनारा व मासेमारीचा व्यवसाय लक्षात घेऊन रत्नागिरीतील शिरगावात 1981मध्ये मत्स्य महाविद्यालय स्थापन करण्यात आले. तेव्हापासून हे महाविद्यालय दापोलीतील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न आहे.

मत्स्य महाविद्यालय कोकणातच; मुख्यमंत्री अनुकूल

या विरोधाची दखल घेत राज्य सरकारने मागील आठवडय़ात मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर दोन वेगवेगळ्या बैठका आयोजित केल्या होत्या. मागील आठवडय़ात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या बैठकीत रत्नागिरीतील मत्स्य महाविद्यालयाच्या संलग्नतेचा विषय आला होता. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. कोकणवासीयांची भावना मुख्यमंत्र्यांनी लक्षात घेतल्या. रत्नागिरीतील मत्स्य महाविद्यालय कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न ठेवण्यास मुख्यमंत्री अनुकूल आहेत.

कोकणवासीयांची नाराजी नको
लोकसभा निवडणुकांच्या नंतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. रत्नागिरीतील मत्स्य महाविद्यालय नागपूर विद्यापीठाला संलग्न केल्यास कोकणवासीय नाराज होतील. त्यामुळे त्यांची नाराजी नको, या निष्कर्षाप्रत भाजपचे नेते आल्याचे सांगण्यात येत आहे.

पदवीदान सोहळा पुढे ढकलला
बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून या वर्षी मिळणाऱया मत्स्य, कृषी, वनशास्त्र, फलोत्पादन, कृषी, अभियांत्रिकी इत्यादी शाखांच्या पदव्यांचा वितरण सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. त्याचा फटका सर्व विद्या शाखांना बसणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या