पालिका रुग्णालयांमध्ये रेमडेसीव्हरचा वापर सुरू; अत्यवस्थ कोरोना रुग्णांना मिळणार जीवदान

1341

पालिका रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या मध्यम आणि प्रकृती गंभीर असलेल्या कोरोना रुग्णांना वाचवणे आता शक्य होणार आहे. आजपासून पालिकेच्या तीन रुग्णालयांत रेमडेसीव्हर या अँटी व्हायरल औषधाचा वापर सुरू करण्यात आला आहे. या आधी फक्त अंधेरीच्या सेव्हन हिल्स रुग्णालयामध्ये रेमडेसीव्हर वापर करण्यात येत होता.

कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकार सर्वोतोपरी उपाययोजना राबवत आहेत. त्यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे. मात्र, अजूनही मुंबई महानगरपालिकेच्या केईएम, शीव आणि नायर रुग्णालयांत कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या उपचारांमध्ये मोठ्या प्रमाणात गुणकारी ठरणार्‍या ‘रेमडेसीव्हर’ या अँटिव्हायरल औषधाचा वापर आतापर्यंत करण्यात आला नव्हता. मात्र, आजपासून तो सुरू करण्यात आला आहे.

पालिकेने खरेदी केली 15 हजार इंजेक्शन्स

मुंबई महानगरपालिकेने हेटेरो हेल्थकेअर या कंपनीकडून रेमडेसीव्हरची 15 हजार इंजेक्शन खरेदी केली आहेत. हेटेरो हेल्थकेअर ही कंपनी ‘कोव्हीफर’ या नावाने औषधांची निर्मिती करते. ‘जिलिड सायन्स’ या मूळ कंपनीकडून हेटेरो हेल्थकेअरसह पाच कंपन्यांनी हे औषध बनवण्याचा करार केला आहे. त्यानुसार, हेटेरो हेल्थकेअर हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांना ‘कोव्हीफर’चा पुरवठा करते. मुंबई महानगरपालिकेने कंपनीकडून मोठ्या प्रमाणात रेमडेसीव्हरची खरेदी केल्यामुळे 5,400 रुपयांना मिळणारे एक इंजेक्शन पालिकेला प्रत्येकी 4,144 रुपयांना मिळाले आहे.

‘पालिका रुग्णालयात रेमडेसीव्हर इंजेक्शनचा वापर आजपासून सुरू करण्यात आला आहे. कोरोनाची लक्षणे असतील त्याप्रमाणे या इंजेक्शनचा दरदिवशी डोस द्यावा लागतो. प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांनाही याचा अधिक उपयोग होणार आहे. यामुळे कोरोनावरील उपचार आणि त्याला रोखण्यात मदत होणार आहे.’ – डॉ. हेमंत देशमुख, डीन, केईएम रुग्णालय

आपली प्रतिक्रिया द्या