मीडियाचाच मीडियावर हल्ला; मुंबईच्या पत्रकारांना डिवचणाऱ्या ‘रिपब्लिक’च्या पत्रकाराला चोपले

मुंबईत गुरुवारी मीडियाचाच मीडियावर हल्ला झाला. कारणही तसेच होते. ‘रिपब्लिक भारत’ या वाहिनीचा पत्रकार प्रदीप भंडारी याने मुंबईतील पत्रकारांना ‘चायबिस्कुट पत्रकार’ म्हणून हिणवले. त्यामुळे संतप्त झालेल्या मुंबईतील पत्रकारांनी भंडारीला चांगलाच चोप दिला. गेट वे ऑफ इंडियाजवळ झालेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

‘रिपब्लिक भारत’ या टीव्ही वाहिनीच्या पत्रकारांचा आगाऊपणा दिवसेंदिवस वाढत आहे. ते आक्रस्ताळेपणे मोठमोठय़ाने ओरडत रिपोर्टिंग करतात. त्यामुळे इतर पत्रकारांच्या कामामध्ये व्यत्यय येतो. ‘रिपब्लिक’चे बहुतांश पत्रकार हे दिल्लीमधून मुंबईत आलेले आहेत. मुंबईशी त्यांचे काहीच देणेघेणे नाही. मात्र इथे येऊन ते मुंबईतील पत्रकारांना नेहमीच कमी लेखण्याचे काम करत असतात. इतर पत्रकारांना धक्का मारल्याशिवाय ते वृत्त संकलन करतच नाहीत. बोलतानाही बेंबीच्या देठापासून जोर लावून बोलतात. त्याचा प्रचंड त्रास इतर पत्रकारांना होतो अशा तक्रारी होत्या.

आज गेट वे ऑफ इंडियाजवळील एनसीबीच्या कार्यालयाबाहेर वृत्त संकलनासाठी अनेक पत्रकार जमले होते. ‘त्यात रिपब्लिक’चा प्रदीप भंडारी हासुद्धा होता. भंडारी हा गडबड-गोंधळ करत होता. खरी पत्रकारिता आम्हीच करतो असे सांगून इतर पत्रकारांना हिणवत होता. त्यामुळे मुंबईतील पत्रकारांचा पारा चढला. त्यांनी जाब विचारला असता भंडारीने त्यांना धक्काबुक्की सुरू केली असे पत्रकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे मुंबईतील पत्रकारांनी भंडारीला चांगलाच हिसका दाखवला.

‘रिपब्लिक’च्या पत्रकारामुळेच वाद

व्हायरल झालेल्या व्हिडीओत भंडारी याला धक्काबुक्की होताना दिसत असली तरी त्याची सुरुवात भंडारीनेच केल्याचे पत्रकारांचे म्हणणे आहे. वाद वाढल्याने पोलिसांनाही त्यात मध्यस्थी करावी लागली. भंडारी याने ‘एनडीटीव्ही’ आणि ‘एबीपी’च्या पत्रकारांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केला आहे, मात्र भंडारी यानेच शिवीगाळ आणि गैरवर्तन केल्यामुळे हा प्रकार घडल्याचे ‘एनडीटीव्ही’च्या सौरभ गुप्ता यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या