मुंबई विमानतळावर आज भव्य शिवजयंती सोहळा

1334

शिवसेना आणि भारतीय कामगार सेनेच्या वतीने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी सकाळी 9 वाजता शिवजयंती सोहळा साजरा केला जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. यंदाच्या शिवजयंतीसाठी विमानतळावरील शिवछत्रपतींच्या पुतळ्याजवळ शिवनेरी किल्ल्याची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे.

पश्चिम द्रुतगती महामार्गावर विमानतळाजवळ शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळचा परिसर शिवजयंतीसाठी भगवामय झाला आहे. या पुतळ्याजवळ गडकिल्ल्यांची कायमस्वरूपी प्रतिकृती उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन तसेच विमानतळाच्या टर्मिनल-2 येथे शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या पुनर्स्थापनेचा उद्घाटन सोहळाही यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. शिवजयंतीनिमित्त गडकिल्ल्यांची स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे.

या शिवजयंती सोहळ्यासाठी पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. परिवहनमंत्री ऍड. अनिल परब आणि भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे. शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी या सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय कामगार सेनेचे चिटणीस संजय कदम यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या