प्रेयसीच्या ओढीने आला, पोलिसांच्या हाती लागला

728

गॅस सिलिंडर एजन्सी चालविण्यासाठी घेऊन भरलेले गॅस सिलिंडर चोरणाऱया राजस्थानच्या एका भामटय़ाला शिवाजी पार्क पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. गेल्या डिसेंबर महिन्यात तब्बल 71 गॅस सिलिंडर चोरून तो पसार झाला होता; पण तो प्रेयसीला भेटण्यासाठी दादर येथे आला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

हुटॉक्सी हुडीवाला (77) यांची दादर परिसरात दादर गॅस एजन्सी आहे. दोन वर्षांपूर्वी कैलासचंद्र बिश्नोई (21) या तरुणाने ती एजन्सी चालविण्यासाठी घेतली. डिसेंबर 2019 मध्ये एजन्सी मालकाने गोदामातील गॅस सिलिंडरची तपासणी केल्यावर त्यांना 71 गॅस सिलिंडर नसल्याचे लक्षात आले. शिवाय कैलासचंद्रदेखील बेपत्ता होता. त्यामुळे कैलासने ते सिलिंडर चोरल्याची तक्रार हुडीवाला यांनी शिवाजी पार्प पोलिसात दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक उत्तेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय पंढरीनाथ कांदे, अंमलदार संदीप शेलार, ज्ञानेश्वर केकाण, उत्तम महाडिक, महेंद्र पाटणे, विनोद पाटील आणि महेंद्र बाविस्कर या पथकाने कैलासचा शोध सुरू केला. पण त्याने मोबाईल बंद केला होता, शिवाय ज्या भाडय़ाच्या खोलीत राहत होता त्या खोलीला कुलूप लावून पळाल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी शहरातील राजस्थानातील नागरिकांकडे चौकशी केली. पण त्याचा देखील काही फायदा झाला नाही. अखेर तांत्रिक बाबींचा अभ्यास केल्यावर कैलास त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी दादरला येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार 23 तारखेला फिल्डिंग लावून पोलिसांनी कैलासच्या मुसक्या आवळल्या.

सिलिंडरची चोरी, गॅसची फिरवाफिरवी

दादर गॅस एजन्सी चालवत असताना कैलासने 71 गॅस सिलिंडर चोरले होते. पण त्याचबरोबर तो गॅसचा झोलदेखील करायचा. अन्य सिलिंडरमधला गॅस काढून तो रिकामे गॅस सिलिंडर भरायचा. मग ते सिलिंडर पुरवायचा, असे पोलीस तपासात समोर आले आहे. त्याने चाळीसगाव येथेदेखील अशाप्रकारे तीन गॅस सिलिंडर चोरल्याचे समोर येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या