निवडणूक डय़ुटीने घेतला महिला कर्मचाऱयाचा बळी

23

सामना प्रतिनिधी । मुंबई

शिवडी विधानसभा विभागात निवडणुकीच्या डय़ुटीवर असलेल्या राज्याच्या सांस्कृतिक विभागातील कर्मचारी प्रीती अत्राम दुर्वे (32) यांचे शनिवारी अकाली निधन झाल्यामुळे सरकारी कर्मचाऱयांमध्ये एकच खळबळ माजली आहे. दुर्वे यांचे काविळीच्या आजाराने निधन झाले, पण त्यांनी आजारपणाची माहिती सरकारला दिली नव्हती, असा दावा जिल्हाधिकारी कार्यालयाने केला आहे. याप्रकरणी चौकशी सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने केली जाणार आहे.

लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी वेगवेगळय़ा सरकारी कार्यालयांतील कर्मचाऱयांची नियुक्ती केली आहे. राज्याच्या सांस्कृतिक विभागातील कर्मचारी प्रीती दुर्वे यांची मुंबई शहराच्या हद्दीतील शिवडी विधानसभा मतदारसंघातील क्षेत्रात नियुक्ती केली होती, पण आजारपणामुळे त्यांचे निधन झाले. त्या आजारी असतानाही त्यांना निवडणूक डय़ुटीवर नियुक्त केल्यामुळे त्यांचे निधन झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱयांनी त्यांची रजा मंजूर न केल्यामुळे दहा दिवस त्यांनी काम केले. 29 एप्रिल रोजी मतदानाच्या दिवशी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांचा शनिवारी मृत्यू झाला, असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला.

जिल्हाधिकारी म्हणतात

प्रीती दुर्वे आजारी असल्याबद्दल निवडणूक विभागाला त्यांनी काहीही कळवले नव्हते अथवा विनंतीही केली नव्हती, असे मुंबईचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे म्हणाले. निवडणूक कामातून मुक्त करण्याबाबत त्यांचे कोणतेही निवेदन निवडणूक कार्यालयाला मिळाले नव्हते. त्यांचे निधन ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे. निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे त्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱयांनी स्पष्ट केले.

1900 कर्मचाऱयांना वगळले
निवडणूक काम करण्यास अडचण असलेल्या 1900 कर्मचाऱयांना वगळण्यात आले होते अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली. या कर्मचाऱयांनी या निवडणुकीच्या कामातून वगळण्यात यावे यासाठी आजारपणासाठी अर्ज केले होते. आजारपणासाठी ज्या कर्मचाऱयांनी विनंती केली त्यांना निवडणूक प्रक्रियेतून वगळण्यात आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या