शीव येथे धोकादायक भुयारी मार्ग बंद! पुलावरील वाहतूक मात्र सुरू!

सामना प्रतिनिधी। मुंबई

शीव रेल्वे स्थानक व धारावी या दरम्यान असलेला भुयारी पादचारी मार्ग पालिकेने धोकादायक ठरवून बंद केला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तेथे दुरुस्तीचे कोणतेही काम सुरू झालेले नाही. निव्वळ बंद करून ठेवलेल्या या धोकादायक भुयारी मार्गावरील पुलावरून मात्र वाहतूक चालू आहे. या अजब प्रकाराने मुंबईकर ‘हैराण’ झाले आहेत.

शीव रेल्वे स्थानकालगतच शीव ते धारावी असा भुयारी मार्ग आहे. तेथून पादचाऱयांची मोठय़ा प्रमाणात वर्दळ असते. परंतु भुयारी मार्गाची अवस्था बिकट असल्याने तो दोन महिन्यांपूर्वी रहदारीसाठी बंद करण्यात आला. तेव्हापासून तेथे कोणतेही दुरुस्तीचे काम पालिकेने हाती घेतलेले नाही. त्याच भुयारी मार्गावरून शीव व धारावीला जोडणारा पूल आहे. त्या पुलावरून वाहनांची मोठय़ा प्रमाणात ये-जा असते. अशी परिस्थिती असेल तर तेथे कधीही मोठी दुर्घटना घडेल अशी भीती परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत. हिमालय पादचारी पूल कोसळण्यासारखी दुर्घटना येथे घडली तरच अधिकाऱयांना जाग येणार का असा सवालदेखील नागरिक करीत आहेत.

bridge-f

दरम्यान, त्या भुयारी मार्गाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. निवडणूक आचारसंहितेमुळे कामाच्या टेंडरिंगचे काम पूर्ण होऊ शकले नव्हते, मात्र आता आम्ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून शक्य तितक्या लवकर दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करू, असे पालिकेच्या एका अधिकाऱयाने सांगितले.

तो भुयारी मार्ग दुरुस्तीकरिता बंद केला आहे परंतु त्या मार्गावरील पुलावरून वाहनांची ये-जा सुरू आहे. ही बाब अनाकलनीय असून तेथील दुरुस्तीचे काम त्वरित सुरू करणे गरजेचे आहे. पावसाळ्याआधी हे काम झाल्यास ते पादचारी आणि वाहतुकीसाठी फायद्याचे ठरेल. दुरुस्तीचे काम सुरू करावे यासाठी आम्ही पालिकेला पत्रदेखील लिहिले आहे.

शहाजी उमाप (पोलीस उपायुक्त वाहतूक, पूर्व उपनगर)…अन्यथा मार्ग खुला करा!
धोकादायक ठरवून भुयारी मार्ग पालिकेने बंद केला पण इतके दिवस झाले तरी दुरुस्तीच्या नावाने बोंब आहे. कोणी अधिकारी त्या ठिकाणी फिरकलाही नाही. धोकादायक म्हणता आणि दुरुस्तीचे काम करीत नाही. शिवाय त्या मार्गावरील पुलावरची वाहतूक सुरू ठेवता. हा प्रकार काही समजेनासा झाला आहे. पावसाळा तोंडावर आला. एखादी दुर्घटना घडण्याची वाट बघता का? जर काम करायचे नसेल तर मार्ग रहदारीसाठी सुरू तरी करा अशी मागणी पादचाऱयांकडून होत आहे.

वाहतुकीचे तीनतेरा
भुयारी मार्ग बंद असल्यामुळे पादचारी मोठय़ा संख्येने एकाच वेळेस रस्ता ओलांडण्यासाठी एल. बी. एस. मार्गावर येतात. परिणामी एल. बी. एस. मार्ग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरून शीव जंक्शनकडे येणाऱया मार्गावर वाहतुकीचा प्रचंड खोळंबा होतो.