वारा मंदावला, धुरक्याने रहिवासी हैराण! मुंबईची हवा आणि तब्येत बिघडली

मुंबईत वाऱयाचा वेग मंदावल्याने हवेचा दर्जा कमालीचा खालावला आहे. त्यामुळे धुरक्याचे प्रमाणही वाढल्याने अनेक मुंबईकरांना प्रदूषण, श्वसनाच्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. पुढील चार दिवस हीच स्थिती राहणार असल्याने मुंबईकरांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मुंबईतील हवेचा निर्देशांक गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरत आहे. सध्या मुंबईचा एअर क्वालिटी इंडेक्स (एक्युआय) 293 इतके म्हणजे ‘खराब’ आणि 300-400 ’अत्यंत खराब’ पातळीच्या जवळ पोहोचली आहे. मागच्या आठवडय़ात मुंबईतील क्वालिटी 232 आणि 270 च्या दरम्यान होती. तर सद्यस्थितीत मुंबईच्या हवेचा दर्जा ‘खराब’ स्थितीत आहे. त्यामुळे मुंबईकरांना श्वसनास त्रास होत आहे. अजून तीन ते चार दिवस हीच स्थिती राहणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. तापमानात अचानक झालेली घट आणि समुद्राकडून येणाऱया वाऱयाचा मंदावलेला वेग यामुळं पुढचे काही दिवस हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

यामुळे वाढले प्रदूषण

नोव्हेंबरच्या शेवटचा आठडय़ापासून सध्या डिसेंबर महिन्यात हवेची गती अत्यंत कमी आहे. मुंबईतील वाहनांची वाढलेली संख्या, रस्त्यांची कामे आणि इतर खोदकामाच्या कामांमुळे हवेत उडणारी धुळ वाहून न जाता थांबली जात आहे. थंडाव्यामुळे या प्रकाराला आणखी चालना मिळत आहे.

समुद्रातही ‘लानिना’ स्थिती तयार झाली आहे. पाच वर्षांनंतर ही स्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये समुद्राचे पाणी गरम होत आहे. शिवाय वाऱयाचा वेगही मंदावला असल्याची माहिती उफरान बेग (जॉइंट डायरेक्टर ऍट इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टॉपिकल मेट्रॉलॉजी) यांनी दिली.

अशी बिघडली हवा

दरवर्षी हिवाळय़ात नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत मुंबईची हवा सर्वात जास्त प्रदूषित असते. मात्र यावर्षी नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा आणि डिसेंबरच्या पहिला आठवडय़ातच असा अनुभव आला आहे. नोव्हेंबरच्या दुसऱया आठवडय़ात तर मुंबईची हवा दिल्लीपेक्षाही ‘खराब’ होती.
प्रदूषण वाढल्याने मुंबईत सध्या सर्दी- खोकल्याची लाट आली आहे. अस्थमा आणि दमा असलेल्यांना तर या वातावरणाचा अधिकच त्रास होत आहे.