पुणे, मिरज येथे विशेष पॅरामेडिकल सेंटरला मान्यता

girish-mahajan

सामना प्रतिनिधी। मुंबई

राज्यात रुग्णसंख्येच्या तुलनेत भासणारी डॉक्टरांची कमतरता आता दूर होणार आहे. बरोबरच डॉक्टर होऊ इच्छिणाऱयांसाठीही खूशखबर आहे. एमबीबीएसच्या 3670 जागा वाढणार आहेत. सात नव्या वैद्यकीय महाविद्यालयांनाही परवानगी मिळाली आहे. यासंदर्भातील राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्राने तत्त्वतः मान्यता दिली आहे.

वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांची शनिवारी नवी दिल्ली येथे भेट घेतली. त्या वेळी त्यांनी हा प्रस्ताव त्यांना सादर केला. महाराष्ट्रात एमबीबीएसच्या 3670 जागा वाढवण्यास केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी मंजुरी दिली. आर्थिकदृष्टय़ा मागासवर्गीय (ईडब्लूएस) विद्यार्थ्यांसाठी त्यातील 2020 जागा याच शैक्षणिक वर्षापासून मंजूर करण्याचा निर्णय झाला आहे. तर सामाजिक व आर्थिक मागासवर्गीय (एसईबीसी) समाजातील विद्यार्थ्यांसाठी 1650 जागा वाढवून देण्यास मान्यता देण्यात आली. त्याबाबतचा निर्णय मात्र सोमवारी होणार आहे. ईडब्लूएसच्या 2020 जागांपैकी 1140 जागा सरकारी तर 880 खाजगी महाविद्यालयांना मिळणार आहेत. एसईबीसीच्या 1650 जागांपैकी 850 सरकारी तर 800 जागा खासगी महाविद्यालयांना मिळणार आहेत.