सुप्रिमो चषकाचा बिगुल वाजला!

सामना क्रीडा प्रतिनिधी । मुंबई

मिनी आयपीएल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुप्रिमो चषक या टेनिस चेंडूने खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट स्पर्धेचा बिगुल दणक्यात वाजला. सिने अभिनेता सुनील शेट्टी, पद्मश्री पुरस्कारप्राप्त धनराज पिल्ले आणि माजी कसोटीपटू लालचंद राजपूत यांच्या प्रमुख उपस्थितीत सुप्रिमो ट्रॉफी व खेळाडूंच्या जर्सीचे अनावरण मोठ्य़ा उत्साहात करण्यात आले. शिवसेनेचे विभागप्रमुख, आमदार संजय पोतनीस व शिवसेनेचे विभागप्रमुख आमदार ऍड. अनिल परब यांच्या पुढाकारामुळे आणि अथक परिश्रमामुळे २०१० सालापासून सुरू झालेल्या हिंदुस्थानातील मानाच्या स्पर्धेला यंदा सात वर्षे पूर्ण होत असून या दोघांच्याच उपस्थितीत यंदाच्या स्पर्धेचा श्रीगणेशा करण्यात आला. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या संकुलात हा सोहळा यशस्वीपणे पार पडला.

लवकरच फुटबॉल व कबड्डीचा सुप्रिमो चषक
फक्त क्रिकेटचीच स्पर्धा आयोजित करण्यात येते. इतर खेळांचा प्रसार व प्रचार करावा वाटत नाही का, असा सवाल पत्रकारांकडून करण्यात आल्यानंतर आयोजक संजय पोतनीस म्हणाले, आम्ही सुरुवातीला क्रिकेटसोबत कॅरम, व्हॉलीबॉल, फुटबॉल यांसारख्या खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. पण सर्व खेळ एकाच वेळी घेणे धकाधकीचे होते. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये या खेळांच्या स्पर्धा घेणे शक्य झाले नाही. पण यंदा पावसाळ्यात फुटबॉलची स्पर्धा घेणार आहोत. यासाठी मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे चेअरमन आदित्य ठाकरे यांचे मार्गदर्शन घेऊ, असेही ते पुढे म्हणाले. तसेच कबड्डी या खेळाची स्पर्धाही घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

खेळाडूंचा गौरव
दिग्गज व्यक्तींच्या उपस्थितीत सुप्रिमो ट्रॉफी व जर्सीचे अनावरण करण्यात आले. यावेळी सुनील शेट्टी, धनराज पिल्ले, लालचंद राजपूत या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत खेळाडूंना गौरवण्यात आले. कल्पिता सावंत, अमित दानी, रवी ठक्कर, रिषांक देवाडिगा, पृथ्वी शॉ, राशी शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. या स्पर्धेला टेनिस चेंडू पुरवणाऱया खन्ना स्पोर्टस् व ज्युनियर भारत श्री रोहन गुरव यांनाही सन्मानित करण्यात आले. तसेच याप्रसंगी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सोळा संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रत्येकी एका खेळाडूला जर्सी देऊन स्पर्धा सुरू झाल्याची घोषणा करण्यात आली.

… अन् पृथ्वी शॉ गवसला
यावेळी शिवसेनेचे विभागप्रमुख आमदार अॅड. अनिल परब यांनी या स्पर्धेबाबतच्या एका संस्मरणीय आठवणीला उजाळा दिला. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुप्रिमो चषकावर अतिशय प्रेम होते. या स्पर्धेतील लढतींवर त्यांचे लक्ष असायचे. एका वर्षी या स्पर्धेतील लढती पाहण्यासाठी त्यांना सांताक्रुझमध्ये येणे शक्य नव्हते. त्यामुळे आम्ही वांद्रे येथील एमआयजी ग्राऊंडवर लढती खेळवल्या. याच स्पर्धेत आम्हाला पृथ्वी शॉ गवसला, असे अनिल परब यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.

प्रमुख पाहुण्यांकडून आयोजकांचे कौतुक
सुनील शेट्टी, धनराज पिल्ले व लालचंद राजपूत या प्रमुख पाहुण्यांकडून शिवसेनेचे विभागप्रमुख आमदार संजय पोतनीस व शिवसेनेचे विभागप्रमुख आमदार अॅड. अनिल परब यांचे कौतुक करण्यात आले. टेनिस चेंडूने खेळवण्यात येणारी ही स्पर्धा आता देशातील नंबर वन स्पर्धा बनली असून दोघांच्या अपार मेहनतीमुळे या स्पर्धेने आगळीवेगळी उंची गाठली असल्याचेही नमूद करण्यात आले. सुनील शेट्टी पुढे म्हणाला, संजय पोतनीस आजही पहाटे साडेसहा वाजता नेटवर फलंदाजी करतात. संजय पोतनीस यांचे क्रिकेटवरील प्रेम वाखाणण्याजोगे आहे. ही गोष्ट सध्याच्या युवकांसाठी प्रेरणादायी ठरू शकते.

आपली प्रतिक्रिया द्या