हॉकीच्या मैदानात उतरण्याची उत्कंठा; मुंबईचा स्टार हॉकीपटू सूरज करकेराचे मनोगत

275

कोरोनामुळे ठप्प झालेले क्रीडाविश्व हळूवारपणे रूळावर येण्याचा प्रयत्न करीत आहे. काही देशांमध्ये खेळांच्या स्पर्धांना सुरूवातही झालीय. हिंदुस्थानात मात्र कोरोना अद्याप नियंत्रणात आला नसल्यामुळे येथे खेळांना सुरूवात व्हायला थोडा उशीर लागणार आहे. याप्रसंगी हिंदुस्थानच्या सीनियर हॉकी संघातील गोलकीपर सूरज करकेरा यांच्याशी दैनिक ‘सामना’ने संवाद साधला. याप्रसंगी मुंबईतील मालाड येथे राहणारा पठ्ठया म्हणाला, कोरोना व लॉकडाऊनमुळे बराच कालावधी हॉकीपासून दूर राहिलो असलो तरी खेळाच्या मैदानात उतरल्यानंतर लय सापडायला उशीर लागणार नाही. हॉकी खेळण्यासाठी क्रीडांगणात उतरण्याची उत्कंठा शिगेला पोहोचलीय. त्यामुळे हॉकीपासून दूर राहिल्यामुळे लय बिघडेल याची चिंता नाहीए, असे स्पष्ट मतही पुढे त्याने व्यक्त केले.

शालेय स्तरापासूनच हॉकीची आवड

आई-वडीलांसह मी मुंबईतील मालाड येथे वास्तव्य करतो. शालेय स्तरापासूनच मला हॉकी या खेळाची गोडी लागली. चिल्ड्रेन्स ऍकॅडमी या शाळेत शिकत असताना 2005 सालापासून हॉकी खेळायला सुरूवात केली. त्यानंतर रिझवी कॉलेजमध्ये शिकत असताना हॉकीकडे गांभीर्याने बघायला लागलो. आता देशासाठी हॉकी खेळतो. तसेच आर्मीमध्ये नोकरीही करतो. मात्र टी वाय बी कॉमची परीक्षा अद्याप दिलेली नाही. ही परीक्षा उत्तीर्ण व्हायचीय, असे सूरज करकेरा यावेळी म्हणाला.

बंगळुरूतील कॅम्पमध्ये छोटेखानी सराव

हिंदुस्थानात मार्च महिन्यात लॉकडाऊन करण्यात आले. तिथपासून आम्ही हॉकीपटू बंगळुरूतच होतो. आमचा कॅम्प सुरू होता. जून महिन्यापर्यंत छोटेखानी सराव केला. यामध्ये जॉगिंग, डम्बेल्स व रबरबॅण्डसह सराव आदीचा समावेश होता. घरी आल्यानंतरही थोडया प्रमाणात सराव सुरू आहे. अद्याप पूर्ण सराव करता आलेला नाही, असे सूरज करकेरा सांगतो.

ऑलिम्पिक अन् जागतिक स्पर्धेत पदक जिंकायचेय

हिंदुस्थानी संघामधून खेळताना ऑलिम्पिक व जागतिक स्पर्धेत पदक जिंकायचेय. हेच स्वप्न प्रत्येक हॉकीपटू बघत असतो. मी ही हाच ध्यास उराशी बाळगलाय. भविष्यात देशाचा झेंडा आंतरराष्ट्रीय स्तरावर दिमाखात फडकवायचाय, असे सूरज करकेरा भावूकपणे सांगतो.

समाधानी पण…

हिंदुस्थानच्या ज्युनियर तसेच सीनियर संघामधून आतापर्यंत खेळता आले आहे. 2017 सालामध्ये ढाका येथे झालेल्या आशियाई कपमध्ये गोल्ड मेडल जिंकलेल्या हिंदुस्थानी संघाचा सदस्य होतो. आतापर्यंतच्या हॉकीमधील कामगिरीने समाधानी आहे. पण अजून मोठा पल्ला गाठायचाय. त्यामुळे आणखी मेहनत घ्यावी लागणार आहे, असे सूरज करकेरा आवर्जून सांगतो.

आपली प्रतिक्रिया द्या