मुंबई टाटा मॅरेथॉनसाठी मुंबई पोलीस तयार

671
फोटो प्रातिनिधीक

रविवारी होणारी मुंबई आंतरराष्ट्रीय टाटा मॅरेथॉन निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी मुंबई पोलीस दल सज्ज झाले आहे. धावपटूंना कोणतीही अडचण होऊ नये शिवाय कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबर मुंबईची वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची तयारी झाली आहे.

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मरिन ड्राईव्ह, हाजी अली, वरळी सागरी सेतू, माहिम कॉजवे असा मॅरेथॉनचा मार्ग असणार आहे. त्यामुळे या मार्गावर कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही, नागरिकांकडून अनुचित प्रकार घडणार नाही तसेच या मार्गावर वाहतूकीचा त्रास होणार नाही याची तयारी करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांकडून जवळपास तीन हजार अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत. शिवाय क्युआरटी, बीडीडीएस, घातपात विरोधी पथक, रिझर्व्ह पोलीस दल, विशेष पथके तैनात राहणार आहेत. त्याचबरोबर वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांचे सहाशे अधिकारी कर्मचारी, तिनशे ट्राफिक वॉर्डन, तसेच तीन हजार स्वंयसेवक तैनात राहणार आहेत.

दरम्यान, शनिवारी मध्यरात्री 3 वाजल्यानंतर मॅरेथॉनच्या मार्गावरील वाहतूक बंद केली जाईल आणि मॅरेथॉन आटोपल्यानंतर रविवारी दुपारनंतर पूर्ववत केली जाईल. तसेच धावपटू धावणार त्या परिसरात येणाऱ्या नागरिकांनी त्या कालावधीत खासगी वाहने आणण्याचे टाळावे मॅरेथॉन निमित्त त्या कालावधी करिता काही मार्गांवरील वाहतूक व्यवस्थेत आवश्यकतेनुसार बदल करण्यात आला आहे. त्यामुळे शक्यतो सार्वजनिक वाहनांचा वापर करावा असे आवाहन उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी केले. तर आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅरेथॉन यशस्वीपण पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, कुठल्याही प्रकारे गालबोट लागेल असे कृत्य करू नये, असे अवाहन उपायुक्त प्रणय अशोक यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या