कृत्रिम खडक करणार समुद्री प्रवाळाचे संरक्षण, मुंबईकर सिद्धार्थची अभिनव कल्पना

94

सामना प्रतिनिधी । मुंबई

प्रवाळ या सागरी जिवांसाठी कृत्रिम खडक तयार करण्याची कामगिरी बी. डी. सोमानी शाळेच्या सिद्धार्थ पिल्लई या विद्यार्थ्याने केली आहे. यामुळे प्रवाळांच्या वाढीसाठी मदत होणार आहे. या अनोख्या संकल्पनेसाठी त्याला पेटंटही मंजूर झाले आहे. लहान वयात सिद्धार्थने केलेल्या कामगिरीबद्दल त्याचे कौतुक होत आहे.

वाढत्या तापमानामुळे प्रवाळांचे नुकसान होत आहे. त्याचा रंग उडत आहे. 30 दिवसांत ते मरण पावत आहेत. मृत प्रवाळ बघून फार त्रास होतो. त्यामुळे जैवविविधतेला बाधा येत आहे. या सर्व गोष्टींमुळे डायविंगची आवड असलेला सिद्धार्थ व्यथित व्हायचा. सागरी प्रजाती वाचवण्यासाठी काहीतरी करणे त्याला आवश्यक वाटू लागले. वडिलांनी सुचवल्याप्रमाणे 45 दिवसांचे त्याने थ्री डी प्रिंटिंगचा कोर्स केला. त्यातूनच कृत्रिम खडक तयार करण्याची संकल्पना त्याला सुचली.

सिद्धार्थने क्राऊड फंडिंग करून 2 लाख रुपये जमवले त्यातून 200 डोलोमाईट सिमेंटचे बॉक्स खरेदी केले. पाँडिचेरी येथील समुद्रात हे 20 मीटर लांबीचे खडक ठेवण्यात आले आहेत. त्यासाठी टेंपल ऍडवेंचर या डाईव्ह सेंटरची त्याला मदत लाभली. प्रवाळांच्या वाढीसाठी कृत्रिम खडक तयार करण्याचा प्रयोग हिंदुस्थानात आतापर्यंत झालेला नाही. बहरिन येथे 2012 साली आणि मालदीव येथेही सिरॅमिक लॅटीसचा प्रयोग झालेला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या