मुंबईला चटका, या महिन्यात मुंबईत दुसऱ्यांदा सर्वाधिक तापमानाची नोंद

मार्चमध्ये दुसऱ्यांदा, रविवारी मुंबईत सर्वाधिक कमाल तापमान 39.4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, अशी माहिती हिंदुस्थानच्या हवामान खात्यानं (IMD) दिली आहे. वारे विलंबाने वाहत असल्यानं पारा वाढला आहे. IMD ने रविवार आणि सोमवारी उष्णतेत वाढ नोंदवली जाण्याची शक्यता आधीच वर्तवली होती.

सांताक्रूझ वेधशाळा आणि कुलाबा वेधशाळेत रविवारी अनुक्रमे 39.4 अंश सेल्सिअस आणि 35.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

‘या महिन्यात दुसऱ्यांदा मुंबईत सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली आहे. 6 मार्च रोजी सांताक्रूझ (वेधशाळा) येथे 39.1 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सर्वाधिक तापमान आहे. रविवारी ते 39.4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले’, असे आयएमडीचे शास्त्रज्ञ राजेंद्र जेनामानी म्हणाले.

ते म्हणाले की, ’12 मार्च रोजी मुंबई आणि किनारपट्टीच्या कोकण भागात नोंदवलेले तापमान सामान्यपेक्षा 4-6 अंश सेल्सिअस जास्त होते.

5-7 मार्च दरम्यान तापमान सामान्यपेक्षा 5-7 अंशांनी जास्त होते तेव्हाही हे दिसून आले, असेही जेनामानी पुढे म्हणाले.

‘सर्वसाधारणपणे, सकाळी 11.30 ते दुपारी 1 या वेळेत समुद्राच्या वाऱ्यामुळे कोकणात कमी तापमान असते. मात्र, गेल्या सात-दहा दिवसांत समुद्रावरील वारे नसल्याने किंवा उशिराने वाहणाऱ्या पूर्वेकडील वाऱ्यांमुळे तापमानात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे’. ते म्हणाले की, ‘राजस्थान आणि गुजरातमध्ये तापमान सर्वोच्च पातळीवर पोहोचले पाहिजे, परंतु वादळी ढग आणि अनुकूल वाऱ्यामुळे तेथील तापमान नियंत्रित आहे.’