मुंबईकरांनो, डोके थंड ठेवा! तीन दिवस उष्णतेची लाट; गरज असेल तरच घराबाहेर पडा

मुंबईकर उन्हाच्या तडाख्याने घायाळ झालेले असतानाच पुढचे तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पुढील तीन दिवस उष्णतेची तीव्र लाट येणार असून मुंबईतही तापमानाचा पारा आणखी वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे भरउन्हात शक्यतो कामाशिवाय घराबाहेर पडू नका, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईकर असह्य उकाडय़ाने हैराण झाले आहेत. गेले काही दिवस सूर्य कोपला असून उन्हाचे चटके आणि घामाच्या धारांनी मुंबईकरांचा जीव कासावीस झाला आहे. त्यात पुढचे तीन दिवस तापमान आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून उन्हात घराबाहेर पडताना काळजी घ्या. गरज असेल तरच बाहेर पडा, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

आणखी काही दिवस चटके सोसा

मुंबई शहर आणि उपनगरांना आणखी काही दिवस उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार आहे. मुंबईत तापमानाचा पारा सध्या वाढताच राहील, असे हवामान विभागाने सांगितले. गुरुवारी मुंबईत कमाल 35 तर किमान 29 अंश सेल्सियस तापमान होते. आजदेखील पारा पस्तिशीपर्यंत गेला होता. पुढचे काही दिवस हवामानात विशेष बदल होणार नाही, असे सांगण्यात आले.

मुंबईत विजेची रेकॉर्डब्रेक मागणी

मुंबईत गेल्या दोन दिवसांत विजेची रेकॉर्डब्रेक मागणी नोंदल्यानंतर आज सुमारे 3800 मेगावॅट एवढी विजेची मागणी नोंदली आहे. घराघरात पंखे आणि एसी गरागरा फिरत आहेत. मागील दोन दिवसांचा विचार करता विजेची मागणी थोडी कमी झाली असली तरी मे महिन्यातील विजेच्या मागणीचा विचार करता तीही जास्त आहे. सदरची विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी टाटा पॉवरने सुमारे 980 मेगावॅट, अदानी इलेक्ट्रिसिटीच्या डहाणू वीज केंद्रातून 355 मेगावॅट वीज उपलब्ध झाली असून उर्वरित 2465 वीज पॉवर एक्सचेंजमधून घेतली आहे.

पारा पंचेचाळिशी गाठणार!

पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. विदर्भासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सर्वाधिक तापमान असेल आणि काही भागांत पारा 45 अंश सेल्सियसपर्यंत जाईल, असा अंदाज आहे.