मुंबई विद्यापीठाच्या वेबसाईटवर कागदपत्रे अपलोड होईनात, सिनेट निवडणूक मतदार यादीतून हजारो शिक्षकांची नावे बाद

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी शिक्षक मतदारांची सुधारित यादी विद्यापीठाने जाहीर केली. मात्र या यादीतून हजारो शिक्षकांची नावे बाद करण्यात आली आहेत. सुधारित मतदार यादीतून तब्बल 1 हजार 378 शिक्षकांची नावे वगळण्यात आली आहेत. विद्यापीठाच्या सर्व्हरमध्ये उद्भवलेल्या तांत्रिक समस्येमुळे अनेक शिक्षकांची कागदपत्रे अपलोड न झाल्यामुळे हे शिक्षक मतदानाच्या हक्कापासून वंचित राहणार असून विद्यापीठाने या शिक्षकांना मतदानापासून वंचित ठेवू नये, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर टीचर्स असोसिएशनने केली आहे.

महाविद्यालयीन शिक्षक प्रवर्गातून सिनेट निवडणुकीसाठी मतदार म्हणून 3 हजार 684 शिक्षकांनी नोंदणी केली होती. त्यातील 1 हजार 378 शिक्षक मतदारांनी चुकीची माहिती दिल्याने त्यांचे अर्ज बाद करण्यात आले. विद्यापीठ शिक्षक मतदार प्रवर्गासाठी 283 शिक्षकांनी नोंदणी केली. त्यातील तब्बल 194 शिक्षकांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. ज्या शिक्षकांची कागदपत्रे अपलोड होऊ शकलेली नाहीत अशा शिक्षकांची नावेही बाद करण्यात आली आहेत. विद्यापीठाने 6 मार्च रोजी परिपत्रक काढून त्रुटी भरून काढण्यासंदर्भात व कागदपत्रे व्यवस्थित अपलोड करण्यासंदर्भातील सूचना दिल्या होत्या. त्यानुसार बऱयाच शिक्षकांनी चुकीची दुरुस्ती करून कागदपत्रे विद्यापीठाच्या बेबसाईटवर अपलोड केलेली असताना देखील विद्यापीठाने आधीचीच यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली, असा आरोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षक संघटनेचे अध्यक्ष, डॉ. अविनाश शेंद्रे यांनी केला आहे.

विद्यापीठ जाणूनबुजून अध्यापकांना या निवडणुकीतून वगळण्याचा प्रयत्न करीत आहे का? अध्यापकांना त्यांच्या मतदानाचा हक्कापासून दूर ठेवायचे आहे का? असे अनेक प्रश्न मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील प्राध्यापकांना भेडसावत आहेत. मुंबई विद्यापीठाच्या निवडणूक प्रक्रियेतून अध्यापकांचा मतदानाचा हक्क नाकारून आपण संविधानाचे उल्लंघन करू नये, असे पत्र असोसिएशनचे अध्यक्ष, डॉ. अविनाश शेंद्रे, सरचिटणीस, डॉ. महेंद्र दहिवले आणि खजिनदार, डॉ. भटू वाघ यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू, प्र-कुलगुरू व कुल सचिव यांना पाठविले आहे.