चेहऱ्याजवळ हात जाताच मिळणार अलर्ट, विद्यार्थ्यांनी तयार केला ’हॅण्ड सॅनिटायझर बँड’

569

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वारंवार चेहऱ्याला हात लावू नका हे जाहिराती, मेसेज, मोबाईल रिंगटोनमधून सतत सांगितले जाते. पण वारंवार सांगून, आठवण करूनही चेहऱ्यावर, नाका-तोंडाजवळ हात जातोच. कोरोनाच्या प्रादुर्भावात ही सवय निगेटिव्हवरून पॉझिटीव्ह होण्यास कारणीभूत ठरणारी आहे. या सवयीवर मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी एक अनोखा प्रयोग यशस्वी केला आहे. या विद्यार्थ्यांनी ‘हॅण्ड सॅनिटायझर बँड’ तयार केला आहे. हा बँण्ड हातात घातल्यास हात चेहऱ्याजवळ गेल्यास लगेचच अलर्ट मिळणार आहे.

मुंबई विद्यापीठामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अखेरच्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी हा बँण्ड तयार केला आहे. कोरोनावर लस शोधण्याचे काम अद्याप सुरू आहे. लस येईपर्यंत सध्या काळजी घेणे हाच एक उपाय आहे. कोरोनाचा संसर्ग तोंड, नाक, डोळे यामार्फत होत असल्याने मास्क घालणे आणि हात सॅनिटाईज करावे, असे उपाय सरकारच्या आरोग्य विभागामार्फत सुचविण्यात येत आहेत. चेहऱ्यास वारंवार हात लावल्याने कोरोनाचा संसर्ग अधिक लोकांना होत असल्याचे लक्षात येताच मुंबई विद्यापीठामध्ये भौतिकशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र विभागात शिक्षण घेत असलेल्या जतीन काडगे, सुश्मिता गुदुळकर या विद्यार्थांनी संसर्ग रोखण्यासाठी हा बँण्ड विकसित करण्याचा निर्णय घेतला.

हा बँण्ड तयार करण्याची कल्पना वनस्पतीशास्त्र विभागाची विद्यार्थिनी सुस्मिता गुदुळकर हिला सुचली. तिने ही युक्ती जतिनला सांगितल्यानंतर हा बँण्ड बनविण्याची तयारी सुरू झाली. या बँण्डच्या सॉफ्टवेअरचे काम आशिष पाठक याने केले. तर जतीन काडगे याने ते विकसित केले. त्यासाठी चार हजार रुपये खर्च आला असून कंपन्याची मदत मिळाल्यास हे यंत्र आणखी कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देता येऊ शकते, असे जतिन याने सांगितले. हे यंत्र प्राथमिक असून यामध्ये आणखी बदल करावे लागतील, असेही तो म्हणाला.

  • या सॅनिटाइजर बँण्डचे दोन भाग आहेत.एक सॅनिटायझर बॉक्स आणि दुसरे कंट्रोलर.
  • हा बँण्ड एका मनगटीपट्टय़ासारखे आहे. त्याला घातल्यावर जेव्हा वापरणारा इसम चेहऱ्यावर हात लावा यचा प्रयत्न करेल तेव्हा ते कंट्रोलरला आपोआप सूचित होईल.
  • हा कंट्रोलर लगेच सॅनिटायझर बॉक्सला सूचित करून यंत्र आपोआप मनगटी भागाजवळ सॅनिटायझर स्प्रे करेल.
  • यामुळे चेहऱ्याला हात लावण्यापूर्वीच हात सॅनिटाइझ होत असल्याने कोरोनाचा संसर्ग रोखणे शक्य होणार आहे.
आपली प्रतिक्रिया द्या