मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सक्तीच्या रजेवर

सामना ऑनलाईन । मुंबई

ऑनलाईन पद्धतीने पेपर तपासून निकाल जाहीर करण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना भोवला आहे. निकाल जाहीर होण्यास होत असलेल्या दिरंगाईमुळे कुलगुरुंना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. देवानंद शिंदे यांच्याकडे मुंबई विद्यापीठाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

राज्यपाल आणि कुलपती सी. विद्यासागर राव यांनी डॉ. संजय देशमुख यांचा रजेचा अर्ज मंजूर केल्यानंतर प्रा. देवानंद शिंदे यांच्याकडे मुंबई विद्यापीठाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या हलगर्जीपणामुळे लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य संकटात सापडले आहे. विद्यार्थी तणावाखाली आहेत. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ३१ जुलै रोजी निकाल जाहीर करू, अशी घोषणा केली होती. मात्र त्यानंतरही सगळ्या शाखांचे निकाल जाहीर होऊ शकले नाहीत. त्यानंतर १५ ऑगस्टपर्यंत निकाल लागतील, त्यानंतर निकालाची छपाई होईल, अशी माहिती मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांनी दिली होती. निकालांच्या या गोंधळामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. विदेशात शिक्षण घेण्यासाठी जाण्यास इच्छुक असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना निकाल न लागल्यामुळे अर्ज करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.