पतीची शेवटची इच्छा होती म्हणून पत्नीने विठ्ठल मंदिराला दिली एक कोटींची देणगी

>> सुनील उंबरे

नवऱ्याची शेवटची इच्छा होती म्हणून पत्नीने एक कोटी रुपयांची रोख रक्कम श्री विठ्ठलाच्या चरणी अर्पण केली. सदर महिला भक्त ही मुंबई मध्ये राहते नुकतेच तिच्या पतीचे कोरोना निधन झाले आहे. मृत्यूपूर्वी सदर महिलेच्या पतीने श्री विठ्ठल मंदिराला देणगी देण्याबाबत शेवटची इच्छा व्यक्त केली होती. त्याची पूर्तता पतीच्या पश्चात पत्नीने पूर्ण केली. धक्कादायक बाब म्हणजे हे कुटुंब मध्यमवर्गीय आहे. यांच्यासाठी ही रक्कम खूप मोठी आहे मात्र पतीच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी सदर पत्नीने विम्याची आलेली सर्व रक्कम मंदिराला देणगी म्हणून सुपूर्द केली. स्वतःची आणि बाळाच्या भविष्याची चिंता श्री विठ्ठलाच्या भरोश्यावर सोडत आपण हा निर्णय घेतल्याचे त्या महिलेने सांगितले.

डोकं अक्षरशः गर्रर्र करणारी ही बातमी आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार मुंबईस्थित हे कुटुंब आहे. एका खाजगी कंपनीत नवरा नोकरीला, एक छोटं बाळ आणि अन हे दोघेचं… श्री विठ्ठलावर अपारश्रद्धा असल्याने हे कुटुंब नेहमी पंढरीला येत असे. मध्यंतरी कोरोनाचा प्रभाव वाढल्यानंतर सदर भक्ताला कोरोनाची बाधा झाली. उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले उपचार सुरु केले मात्र शेवटी मृत्यूने गाठलेच. मृत्यू दाराशी आला आहे आपण यातून आता वाचणार नाही याची जाणीव त्या भक्ताला होऊ लागताच त्याने आपल्या पत्नीला शेवटची एक इच्छा पूर्ण करशील का म्हणून शब्द घेतला. तो शब्द होता माझ्या मृत्यूनंतर विम्याची काही रक्कम मिळेल त्यातील एक कोटी रुपये तू पंढरपूरच्या श्री विठ्ठलाच्या चरणी अर्पण कर… नवऱ्याच्या या अनपेक्षित बोलण्याने भावनाविवश झालेल्या पत्नीने आपल्या पतीला शब्द पाळण्याचे वचन दिले. कालांतराने पैसे मिळाले. पतीला दिलेल्या वचनाची पूर्तता पत्नीने मनात कसलाही किंतु न आणता पूर्ण करण्याचे ठरविले.

या पती पत्नीच्या संसाराला आता कुठे सुरवात झाली होती संसारात एका बाळाचे आगमनही झाले होते. पण नियतीला हे पहावलेच नाही. बाळाला आणि पत्नीला सोडून तो भक्त देवा घरी गेला. पतीच्या पश्चात त्याचे आलेले विम्याचे पैसे त्यातील एक कोटी रुपये श्री विठ्ठल मंदिराला देणगी देऊन पत्नीने पतीची शेवटची इच्छा पूर्ण केली. जाताना त्या मायमाऊलीने मंदिर समिती व्यवस्थापनाला विनंती केली. मी सामान्य कुटुंबातील आहे मी एवढी मोठी रक्कम देणगी दिल्याचे पाहून आणि ऐकून अनेकांना वाटेल हिच्याकडे भरपूर पैसे आहेत आणि लोकं मला त्रास देतील त्यामुळे माझे नाव गुपित ठेवा अशी विनंती केली. ही विनंती मंदिर समितीने मान्य करीत तीला पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप दिला.

आपली प्रतिक्रिया द्या