पृथ्वी शॉच्या दणदणीत शतकाच्या बळावर मुंबईने मिळवला तामीळनाडूवर विजय

सामना ऑनलाईन। मुंबई

लाईक करा, ट्विट करा

१७ वर्षीय पृथ्वी शॉने राजकोट येथे झालेल्या पदार्पणाच्या लढतीत १२० धावांची धडाकेबाज  खेळी साकारत गतविजेत्या मुंबईला तामीळनाडूवर सहा गडी राखून दिमाखदार विजय मिळवून दिला. मुंबईच्या या पठ्ठ्याने २७२ मिनिटे खेळपट्टीवर उभे राहून १७५ चेंडूंचा सामना करताना एक षटकार व १३ चौकारांनिशी १२०  धावांची संस्मरणीय खेळी साकारली.

पृथ्वी शॉने पहिल्याच प्रथमश्रेणी सामन्यात दर्जेदार शतक झळकावत आपण लंबी रेस का घोडा असल्याचे दाखवून दिले. तसेच पहिल्याच सामन्यात शतक मारणाऱया दिग्गज खेळाडूंच्या यादीतही धडक मारली.  मात्र या यादीत जाण्यापूर्वी त्याला जोर का झटका बसला होता. ९९ धावांवर असताना विजय शंकरच्या गोलंदाजीवर शॉर्ट थर्ड मॅनला त्याचा झेल टिपला गेला. पण पंचांनी गोलंदाज विजय शंकरचा पाय रेषेपुढे गेला की नाही याची खात्री करून घेण्यासाठी तिसऱ्या पंचाकडे दाद मागितली. अखेर हा चेंडू नो बॉल ठरवण्यात आला. त्यामुळे पृथ्वी शॉने सुटकेचा निःश्वास सोडला.

पृथ्वी शॉ हा खरे तर गरीब घराण्यातील मुलगा. त्याच्यातील खरे गुण हेरले ते शिवसेनेचे आमदार, विभागप्रमुख संजय पोतनीस यांनी.  पृथ्वी शॉने फक्त आणि फक्त क्रिकेटवर लक्ष केंद्रित करावे यासाठी संजय पोतनीस यांनी त्याच्या खाण्यापिण्यापासून वास्तव्यापर्यंतची सर्व जबाबदारी स्वत:कडे घेतली. गेली अनेक वर्षे ते पृथ्वी शॉची काळजी घेत आहेत. संजय पोतनीस यांनी दाखवलेल्या माणुसकीला सलाम! त्यांनी पृथ्वी शॉचे बळ वाढवले. त्यांच्या पुढाकारामुळे लवकरच हिंदुस्थानच्या सीनियर संघाला हरहुन्नरी चॅम्पियन खेळाडू मिळेल असा विश्वास हिंदुस्थानचे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केला.