चोरटय़ांनी मोबाईल खेचल्याने धावत्या रिक्षातून पडून तरुणीचा मृत्यू

कळव्याजवळ धावत्या लोकलमध्ये चोरटय़ाने मोबाईल खेचल्याने लोकलखाली चिरडून विद्या पाटील यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच ठाण्यात आणखी एका तरुणीचा मोबाईल चोरटय़ांमुळे बळी गेला. मोटारसायकलीवरून धूम स्टाईलने आलेल्या चोरटय़ांनी रिक्षातून प्रवास करणाऱया तरुणीचा मोबाईल खेचल्याने तिचा रिक्षातून पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तीन हात नाका येथे घडली. कनमिला रायसिंग (27) असे तिचे नाव आहे. याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी भिवंडीतून दोघांना ताब्यात घेतले आहे.

अंधेरी येथे राहणारी कनमिला रायसिंग ही तरुणी ठाण्यातील एका मॉलमध्ये कामाला होती. बुधवारी उशिरा रात्री ती मैत्रिणीसोबत घरी जाण्यासाठी निघाली होती. मॉलसमोरून रिक्षात बसून त्या थेट घरी निघाल्या. त्यांची रिक्षा तीन हात नाका परिसरात आली असताना पाठीमागून काळय़ा रंगाच्या मोटारसायकलवरून आलेल्या दोन चोरांपैकी एकाने कनमिलाच्या हातावर फटका मारून तिच्या हातातील मोबाईल खेचला. या झटापटीत ती रिक्षातून खाली पडली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी अल्केश अन्सारी व सोहेल अन्सारी या चोरटय़ांना ताब्यात घेतले.

आपली प्रतिक्रिया द्या