लाखो मुंबईकरांना कोस्टल रोड हवाय! पालिकेचा हायकोर्टात युक्तिवाद

17

सामना ऑनलाईन, मुंबई

मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवर राज्य सरकार तसेच महापालिकेच्या वतीने 29.2 किमी लांबीचा कोस्टल रोड बांधण्यात येणार आहे. या कोस्टल रोडसाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या असून लाखो मुंबईकरांना हा कोस्टल रोड हवाय. पर्यावरणाची हानी होऊ नये याची काळजी घेऊनच या प्रकल्पाचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे लोकहिताच्या या प्रकल्पाला विरोध करणे चुकीचेच असल्याचा दावा मुंबई महापालिकेच्या वतीने आज हायकोर्टात करण्यात आला.

कोस्टल रोडमुळे मच्छीमारांच्या व्यवसायावर परिणाम होणार असून पालिका तसेच राज्य सरकारने पर्यावरणविषयक परवानग्या घेतल्या नाहीत असा आरोप करीत वरळी कोळीवाडा नाखवा आणि वरळी मच्छीमार सर्वोदय सहकारी सोसायटीच्या वतीने हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्राजोग आणि न्यायमूर्ती एन. एम. जामदार यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी घेण्यात आली.

याचिकाकर्त्यांचा दावा फेटाळला

पालिकेच्या वतीने ज्येष्ठ वकील दरायुस खंबाटा यांनी बाजू मांडत प्रकल्पाला असलेला विरोध चुकीचा असल्याचे सांगत याचिकाकर्त्यांचा दावा फेटाळून लावला. त्याचबरोबर आठ भागांमध्ये हा प्रकल्प विभागण्यात आला असून प्रकल्पाचे नुकसान टाळत या प्रकल्पाचे काम करण्यात येणार आहे, असे त्यांनी खंडपीठाला सांगितले. याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार या प्रकल्पाचा समुद्रीजीवावर परिणाम होणार आहे, परंतु तसे काही नाही या प्रकल्पाचे काम करताना सागरी जैवविविधता शाबूत राहील या दृष्टीने कोस्टल रोडचे काम करण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या