चांदोबा चांदोबा रागावलास का?

66

सामना ऑनलाईन, मुंबई

१५० वर्षांनंतर आज अवकाशात दुर्मिळ योग जुळून आला. सौंदर्याचा कारक असलेल्या चंद्राला खग्रास ग्रहण लागले. तो पृथ्वीच्या छायेखाली झाकला गेला. ती छाया हळूहळू दूर होतानाच चंद्र लालबुंद झाला होता. तो रागावला की काय असेच सर्वांना वाटले; पण ग्रहणातून त्याची सुटका होताना सूर्याने पृथ्वीच्या वातावरणातून त्याच्यावर टाकलेला तो तेजस्वी कटाक्ष होता. आकाशातील हे विलोभनीय दृश्य शास्त्रज्ञांच्या अत्याधुनिक दुर्बिणींबरोबरच जगातील अब्जावधी डोळ्यांनी पाहिले.

चंद्राची तीन वेगवेगळी रूपे आज जगाने पाहिली. महिन्यात दुसऱयांदा पूर्ण उगवून तो ‘ब्लूमून’च्या रूपात दिसला. नेहमीपेक्षा ३० टक्के जास्त तेजस्वी आणि १४ टक्के जास्त मोठा होऊन तो ‘सुपरमून’ बनला होता. आणि सूर्याच्या लाल-तपकिरी किरणांमुळे त्याचा रंगही तसाच दिसल्याने त्याला ‘ब्लडमून’ म्हणून लोकांनी डोळ्यांत साठवले. जगभरातील शास्त्रज्ञ, खगोलप्रेमी, नागरिक या दुर्मिळ योगाचे साक्षीदार बनले.

ग्रहणातील चंद्रकला पाहण्यासाठी मुंबईत मरिन ड्राइव्ह, वरळी सी-फेस, गिरगाव आणि दादर चौपाटी, शिवाजी पार्क, नेहरू तारांगण तसेच मोकळ्या मैदानांमध्ये लोकांनी गर्दी केली होती. शिवाजी पार्क येथील शिवरायांच्या पुतळ्याजवळ खगोल मंडळाच्या वतीने दुर्बिणी लावण्यात आल्या होत्या. अनेकांनी ग्रहणदृष्य आणि चंद्राची बदलणारी रुपे मोबाईलमध्ये तसेच कॅमेऱयांमध्ये कैद केली. घरामध्ये बसलेल्या मंडळींनीही इंटरनेटवर ‘नासा’ने जारी केलेली चंद्रग्रहणाची डोळ्यांची पारणे फेडणारी दृष्ये पाहिली. यापूर्वी ३१ मार्च १८६६ रोजी ‘ब्लू-ब्लड-सुपरमून’ असा तिहेरी योग जुळून आला होता.

साई मंदिर, सिद्धिविनायक मंदिर चार तास बंद

खग्रास चंद्रग्रहणामुळे मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिर आणि शिर्डीतील साईबाबा मंदिर सायंकाळी ५ ते रात्री ९ या काळात दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले. यादरम्यान दोन्ही ठिकाणी भक्तांनी मोठय़ा प्रमाणावर गर्दी केली होती. श्री सिद्धिविनायक मंदिरात तर मंगळवार असल्याने भाविकांची चांगलीच गर्दी उसळली. ग्रहण काळात मंदिरांबाहेरच अखंडपणे मंत्रोच्चार सुरू होते. मंदिराबाहेरच भाविकांनी श्रींची आणि साईबाबांची प्रतिमा ठेवून तीचे अखंड पूजन सुरू ठेवले होते.

खग्रास चंद्रग्रहणाची चर्चा सोशल मीडियावरही दिवसभर रंगली. ग्रहण काळात व्हॉट्सऍपवरून खाद्य पदार्थ फॉरवर्ड करू नयेत. नेटवर्क रेंज दुषित असते. या काळात फेसबुकवर, व्हॉट्सऍपवर तुळशीपत्र ठेवावे… डीपी म्हणून चंद्राचे जुने फोटो फॉरवर्ड करू नयेत. प्रेयसीच्या चेहऱयाला चंद्राची उपमा देऊ नये. चंद्रकांत-सूर्यकांत यांचे सिनेमे टाळावेत, अशा प्रकारचा मेसेज सर्वत्र फिरत होते

आपली प्रतिक्रिया द्या