उघड्यावर घाण करणाऱ्या 1 लाख 16 हजार मुंबईकरांना 3 कोटी 36 लाखांचा दट्ट्या

मुंबईत उघड्यावर घाण करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पालिकेने – नेमलेल्या क्लीन-अप मार्शलकडून धडक कारवाई सुरू असून गेल्या सात महिन्यांत तब्बल तीन कोटी 35 लाख 79 हजार 212 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये उघड्यावर थुंकणे, शौच करणे, मूत्र विसर्जन करणे आणि इतर प्रकारे घाण करणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई करण्यासाठी मुंबई शहर – आणि दोन्ही उपनगरात मिळून 1087 क्लीन-अप मार्शलची नेमणूक करण्यात आली आहे.

उघडयावर घाण करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पालिकेकडून गेल्या काही वर्षांपासून क्लीन अप मार्शलची नेमणूक करण्यात येत आहे. मात्र कोरोना काळात क्लीन अप मार्शलबाबत आलेल्या तक्रारी आणि कंपनीची मुदत संपल्याने काही महिने मुंबईत क्लीन अप मार्शल नव्हते. मात्र पालिकेने निविदा प्रक्रिया राबवून मे 2024 पासून पुन्हा एकदा क्लीन-अप मार्शलची नेमणूक केली आहे. या क्लीन अप मार्शलकडून मुंबईभरात कारवाई सुरू आहे. उघड्यावर घाण केल्यास 200 ते एक हजार रुपयांपर्यंतचा दंड केला जात आहे.

अशी झाली कारवाई

मुंबईभरात कारवाई करण्यासाठी एकूण 1087 क्लीन- अप मार्शल नेमण्यात आले आहेत. यामध्ये 1 लाख 16 हजार433 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये 33579212 रुपयांचा दंड वसूल.

यामध्ये सर्वाधिक जास्त कारवाई ‘ए’ बॉर्ड फोर्ट विभागात करण्यात आली असून या ठिकाणी 31 हजार 419 जणांवर कारवाई करण्यात आली असून 62 लाख 29 हजार 712 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

तर सर्वात कमी कारवाई ‘बी’ विभाग डोंगरी भागात1286 जणांवर कारवाई करण्यात आली असून 3 लाख 63 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.